धक्कादायक ! PPE कीट तयार करणाऱ्या कंपनीतील कर्मचारी निघाले ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात राहण्यासाठी आणि आपले कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी आरोग्य कर्मचारी पीपीई कीटचा वापर करतात. कोरोना संकटामध्ये पीपीई कीट जीवनावश्यक वस्तू बनली आहे. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकच्या पालखेड एमआयडीसीतील पीपीई कीट बनवणाऱ्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

देशात आणि राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक कंपन्यांनी पीपीई कीटचे उत्पादन सुरु केले आहे. आरोग्य कर्मचारीच नाही तर लहान-मोठे उद्योजक आणि सामान्य नागरिक देखील पीपीई कीटचा वापर करू लागल्याने याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिकमध्ये पीपीई कीट तयार करणाऱ्या कंपनीतील तब्बल 44 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ही कंपनी तातडीने बंद करण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीतील पालखेड परिसरातली ही कंपनी आहे. या कंपनीत एकाच वेळी 44 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना सरकारी कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच ही कंपनी तात्पुरती बंद करण्यात आली आहे. कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर कंपनी विरोधात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कंपनीने कर्मचारी कंपनीत येण्यापूर्वी त्यांच्या शरीराचे तापमान तपासले नव्हते का ? सॅनिटायझर व मास्कचा वापर बंधनकारक केले होते का ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.