2,11,000 ची ‘लाच’ स्विकारताना ‘PWD’ चा सहाय्यक अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहासाठी इमारत भाडेतत्वावर शासनाला देण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाचे मुल्यांकन करून प्रमाणपत्र देण्यासाठी 7 लाख 3 हजार रुपयांची लाच मागून 2 लाख 11 हजार रुपयांची लाच स्विकारताना सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकास नाशिक अ‍ॅन्टी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे. भारत सुदाम चव्हाण असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचे नाव आहे.

तक्रारदार यांची स्वत:ची इमारत असून ही इमारत सामाजिक न्याय विभाग, मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहासाठी भाडेतत्वावर देण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. इमारतीचे मुल्यांकन करून, भाडे प्रस्तावित करून प्रमाणपत्र देण्यासाठी भारत चव्हाण यांनी तक्रारदाराकडे एक महिन्याचे वस्तिगृहाचे 7 लाख 3 हजार रुपयांचे भाडे लाच म्हणून मागितले. तडजोडीमध्ये 2 लाख 11 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदाराच्या तक्रारीनंतर पंचासमक्ष पडताळणी केली असता चव्हाण याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातील त्याच्या कक्षात लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले. लाचलुचपत विभागाने नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आज सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्विकारताना भारत चव्हाण याला रंगेहाथ पकडले.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Visit : policenama.com