नाशिक : पिंपळगाव बसवंतमध्ये चार ज्वेलर्सच्या दुकानांवर दरोडा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – कांद्याची बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंतमधील (Pimpalgaon) मेन रोडवरील चार ज्वेलर्सच्या दुकानांवर दरोडेखोरांनी दरोडा (Robbery) टाकून लाखोंचा माल चोरुन नेला आहे. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी पहाटे हा दरोडा टाकण्यात आला आहे.

पिंपळगावातील मेन रोड वेशीलगत असलेल्या विलास नारायण बिरारी यांची दोन दुकाने बिरारी ज्वेलर्स तर भगवान राठी यांचे श्रीराम ज्वेलर्स आणि जुना आग्रा महामार्गावरील अथर्व खरोटे यांचे अलंकार ज्वेलर्स अशी चार दुकाने चोरट्यांनी फोडली.

चोरटे पहाटेच्या दुकानात एका कारमधील चौघे चोरटे आले. त्यांनी दुकानाचे सेंट्रल लॉक कटावणीच्या सहाय्याने उचकटून काढले. त्याचवेळी त्यांना दुकानाबाहेर सीसीटीव्ही लावलेले दिसले. त्यांनी तो सीसीटीव्ही फोडला. त्यानंतर दुकानात शिरले. आतमध्ये ट्रेमध्ये ठेवलेले दागिने आपल्याकडील पिशवीत पटापट भरले. चौघांनी दोन मिनिटात दुकानातील सर्व शोकेस व ट्रेमधील दागिने मोठ्या पिशवीत भरुन त्यांनी पळ काढला. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. चोरट्यांनी किती माल लुटून नेला याची दुकानदार मोजदाद करत आहेत.

चोरट्यांनी आपली ओळख लपविण्यासाठी पीपी कीट सारखे कपडे घातले होते. डोक्यावर टोपी घालून तोंडाला रुमाल लावले होते. त्यामुळे त्यांचे चेहरे दिसून येत नव्हते.