नाशिकचा कांदा बांगलादेशला, रेल्वेला 22 कोटींचे उत्पन्न

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची मागणी वाढली आणि एक लाख मेट्रिक टनाहुन अधिक रेल्वेच्या माध्यमातून बांगलादेशात कांदा निर्यात झाला यातून रेल्वेला 22 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले तर दुसरीकडे कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे

यंदा उन्हाळ कांद्याचे उत्पादन 130 टक्के झाले त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे देशासह जागतिक बाजारपेठेत कांद्याची मागणी घसरल्याने कांद्याचे बाजार भाव एक हजार रुपयांच्या आत येत सरासरीला पाचशे ते सहाशे रुपये इतका प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आणि कांदा उत्पादकाला आपला कांदा हा तोट्यात विक्री करण्याची वेळ आली त्यातच बांगलादेशातून वाढलेल्या मागणीमुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, मनमाड, निफाड, खेरवाडी आणि नाशिक रोड या रेल्वे स्थानकाच्या मालधक्क्यावर 55 मालगाड्यांमधून कांदा आत्तापर्यंत बांगलादेशाला पाठवण्यात आला.

यातून रेल्वेला एका मालगाडी मागे 40 लाख रुपये इतके भाडे मिळाले यातून 55 मालगाड्यांच्या मागे 22 कोटींचे उत्पन्न मिळाले तर कांदा व्यापाऱ्याला नफा मिळाला मात्र चार महिने शेतकऱ्यांने कांदा पोटाच्या मुलासारखा जगविला आणि तो बाजारात विक्री केला तर त्याला चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल मागे तोटा झाला याकडे केंद्र सरकार लक्ष देणार का हा सवाल कांदा उत्पादकांनी उपस्थित केला असून विक्री झालेल्या आणि विक्री होणाऱ्या कांद्याला पाचशे रुपये अनुदान देण्याची मागणी केली जात आहे.