निफाडचा पारा 2.4 अंशापर्यंत घसरला

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – मकर संक्रांतीच्या संध्याकाळपासून थंडीचा जोर वाढल्याने निफाड तालुक्यात पाऱ्यात लक्षणीय घट झाली आहे. तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहु संशोधन केंद्रात शुक्रवारी पारा 2.4 अंशापर्यंत घसरल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे द्राक्षपंढरीतील द्राक्ष उत्पादक चिंतेत सापडले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढचे तीन ते चार दिवस थंडीचा जोर कायम राहणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये दरवर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून थंडीचा जोर वाढतो मात्र यावर्षी संपूर्ण डिसेंबर महिना उलटून गेल्यानंतरही थंडी दहा अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याचे नाव घेत नव्हते. मात्र 9 जानेवारीपासून थोड्याफार प्रमाणात थंडी जाणवायला लागली.

गेल्या आठवडाभरापासुन निफाडचा पारा घसरत आहे. उत्तर भारतातील थंडगार हवेचा परिणाम तपमान घसरत आहे. आठवड्यापासुन पारा घसरण सुरु आहे. शुक्रवार (दि 17) जानेवारी रोजी पारा 2.4 अंशावर असल्याची नोंद कुंदेवाडी येथील‌ कृषी संशोधन केंद्रात करण्यात आली आहे. त्यात आता थंडीची लाट तयार होत असल्याने परिपक्व द्राक्षमण्यांना तडे जाण्याचे धोके आहेत. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन द्राक्षबागेत पहाटेपासुन ठिबक सिंचन सुरु करावे लागत आहे. तर तालुक्यात काही भागात पाचटावर दवबिंदु गोठल्याचे चित्र दिसत होते.

या थंडित अगोदरच लांबलेला द्राक्षहंगाम अजुन पंधरा ते विस दिवस पुढे ढकलला आहे. त्यात थंडीने नुकसान होणार असल्याने द्राक्ष उत्पादकांवरिल संकट अधिक गडद झाले आहे. जानेवारीच्या दुसर्‍या पंधरवड्यात का होईना थंडीचा जोर वाढल्याने गुरुवारी दिवसभर लोक मोकळ्या जागेत उन्हात उभे राहून उब मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. या वाढलेल्या थंडीमुळे उघड्यावर काम करणारे कामगार भाजी विक्रेते यांनी रस्त्याच्या कडेला शेकोट्या पेटलेल्या दिसत होत्या.

वारकर्‍यांचे हाल
त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथांची यात्रा सोमवार दिनांक 20 रोजी आहे. त्यासाठी राज्यभरातील वारकरी त्र्यंबकेश्वर कडे मार्गस्थ होऊन नाशिक जिल्ह्यात पोहोचले आहेत. नेमके याच काळात थंडीचा जोर वाढल्याने वारकऱ्यांचे या थंडीमुळे मोठे हाल होत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/