नाशिक : विद्यार्थ्याने ICU मधून दिला दहावीचा शेवटचा पेपर

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – खरेतर दहावी आणि बारावीचे वर्ष म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या अतिमहत्वाची वर्षे मानली जातात. याचे महत्व नाशिकमधील एका दहावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला कळाले, त्याने चक्क आयसीयू मध्ये दाखल होऊन देखील दवाखाण्यातच आपला इयत्ता दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर दिला आहे. प्रणव माळी असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील ओझर येथील एचएएल हायस्कूलचा विद्यार्थी प्रणव माळी नियमितप्रमाणे दहावीचे पेपर देत होता. मात्र अचानक गुरुवारची तो जिन्यावरून पडला गंभीर जखमी झाला. त्याचे नाक फॅक्चर झाले तसेच त्याच्या हातापायाला देखील लागले आहे. त्यामुळे त्याला नाशिकमधील पंचवटी भागातातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला ४८ तास ICU मध्ये ठेवण्यात आले होते.

ऐन दहावीच्या वर्षी पेपर दिला नाही, तर त्याचे संपूर्ण वर्ष वाया जाईल त्यामुळे प्रणवच्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांशी तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या नाशिक बोर्डाचे सचिव नितीन उपासनी यांच्याशी संपर्क साधला. मुलाचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ देऊ नये यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. प्रणव माळीची जिद्द तसेच पालक आणि मुख्याध्यापकांची इच्छा बघून उपासनी यांनी त्याला सहकार्य करण्याचे ठरविले आणि आयसीयुमध्ये परीक्षा घेण्याची तयारी केली. मात्र, वैद्यकिय अहवाल, प्रमाणपत्र, मुख्याध्यापकांचे शिफारसपत्र मागवून घेण्यात आले. ते त्यांनी बोर्डाला आज सादर केले.

त्यानुसार आज सकाळी ओझरवरून त्या मुलाचा बारकोड असलेली उत्तर पत्रिका मागून घेण्यात आली. पंचवटीतील स्वामी नारायण शाळेतून उत्तरपत्रिका घेण्यात आली. आणि १० वाजून ५० मिनीटांनी प्रणवला देण्यात आली. एक सुपरवायझरही आयसीयुत नियुक्त करण्यात आला आणि एक वाजता त्याचा पेपर घेऊन तो नितीन उपासनी यांनी सीलबंद करून पुन्हा परीक्षा केंद्राकडे पाठवून दिला. त्यामुळे आयसीयुमध्ये असूनही त्याला परीक्षा देता आल्याचे समाधान मिळाले.

You might also like