Nashik News : युवकाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –  प्रेमप्रकरणासारख्या कारणावरुन सातपुरा भागात राहणाऱ्या एका 28 वर्षीय युवकाने गावठी पिस्तूलातून स्वत:च्या छातीवर गोळी झाडून घेत जीवनप्रवास संपविल्याची धक्कादायक घटना ‘व्हॅलेंटाईन दिना’च्या पूर्वसंध्येला शनिवारी (दि.13) सकाळी आठ वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे नाशिक शहर हादरुन गेले आहे.

सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत रोहित राजेंद्र नागरे (वय-28 रा. शिवनेरी चौक, आठ हजार वसाहत, सातपूर कॉलनी) हा शुक्रवारी (दि.13) रात्री बाराच्या सुमारास घरातून कोणालाही काहीही न सांगता आपली पल्सर (एमएच 15 एफजे 4687) घेवून रात्री 12 ते पहाटे 4 दरम्यान बाहेर पडला. सातपूर औद्योगिक वसाहत व भवर मळामधून जाणाऱ्या नाल्याच्या कडेच्या रस्त्यावर एका झाडाखाली स्वत:वर देशी बनावटीच्या पिस्तूलातून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. घटनास्थळी देशी बनावटीचे पिस्टल व दुचाकी मिळाली आहे. पिस्टलमध्ये एकच गोळी होती.

कोणाशी ही वाद नाही अन् पोलिस रेकॉर्डही नाही

रोहित याचे कोणाशी ही वाद नव्हते तसेच त्याचे कोणतेही क्रिमिनल रेकॉर्ड नसल्याची माहिती नातेवाइकांनी यावेळी दिली. पोलिसांनी शेवटचे फोन कॉल्स व इतर माहिती घेण्यासाठी रोहितचा मोबाइल ताब्यात घेतला असून मोबाइल मधील व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस् तपासले असता सर्व स्टेटस् प्रेमभंग अथवा प्रेमप्रकरणाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रोहितने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज सातपुर पोलिसांनी व्यक्त केला आहे. सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रोहितने आत्महत्या केली की कोणी आत्महत्येचा बनाव करुन हत्या केली, याचा तपास पोलिस करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त अशोक नखाते, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर मोरे, गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंचल मुदगल, मनसे गटनेते सलीम शेख आदींनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.