नाशिकमध्ये पोहताना बुडून तिघांचा मृत्यू, मृतापैकी एकजण मुंबई पोलीस दलातील

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिकमधील पिंपळद इथल्या वालदेवी नदीच्या धरणावर सिडकोमधील चारजण पोहण्यासाठी गेले असता यातील तिघांचा बुडून मृत्यू झाला. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचे गावकर्‍यांनी सांगितले आहे. मृतांपैकी एकजण मुंबई पोलिस दलातील होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सिडकोतील मंगेश बाळासाहेब बागूल (वय 33, रा. पाथर्डी फाटा), वैभव नानाभाऊ पवार (वय 26, रा. श्रीराम चौक, उत्तमनगर), महेश रमेश लाळगे (वय 33, रा. महाकाली चौक, पवननगर) आणि गणेश एकनाथ जाधव (वय 29) हे चारजण पिंपळद इथल्या वालदेवी नदीच्या धरणावर गेले होते.

सुरुवातीला गणेश जाधवला सोडून तिघांनी पाण्यात पोहण्यास सुरुवात केली. मात्र, या धरण काठाजवळ पाण्याची खोली जास्त होती. या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेजण बुडाले. हा सर्व प्रकार गणेश जाधव याच्या लक्षात येताच त्याने आरडाओरड केली. यावेळी आजूबाजूलाच्या ग्रामस्थांनी धावत येऊन तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच वाडीवर्‍हे पोलिस ठाण्याचे निरीक्षक विश्वजित जाधव यांच्यासह उपनिरीक्षक नितीन पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने मंगेश, वैभव आणि महेश यांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत तिघे मृत झाले होते.

मृत तिघांपैकी मंगेश बागूल हा मुंबई पोलिस दलात कॉन्स्टेबल होता. वैभव पवार याचे पुणे येथे एम. ई.चे शिक्षण सुरू होते, महेश लाळगे हा डाटा मेट्रिक्स येथे नोकरी करीत होता. पोलीस दलातील मंगेश बागूल याच्या मागे पत्नी, दोन भाऊ, बहीण, आई-वडील असा परिवार आहे. महेश लाळगे याच्या मागे पत्नी, भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. तर वैभव पवार इंजिनीअर होता. त्याच्या मागे बहीण, आई-वडील असा परिवार आहे.

मित्राला वाचविताना तिघे बुडाले
मित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात तिघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुरुवातीला एकजण पाण्यात उतरला होता, मात्र, तो बुडत आहे, असे लक्षात आल्यानंतर दुसर्‍याने आणि त्यानंतर तिसर्‍याने पाण्यात उडी मारली, असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

मालेगावनजीक पर्यटनस्थळी दोघांचा बुडून मृत्यू
मालेगावनजीक पर्यटनस्थळावर तळ्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली होती. मृतापैकी दोघेही तरूण होते. याबाबत पोवारवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी सांगितले, अंदाजे वीस वर्षे वयाचे हे तरुण धबधब्याच्या खाली तयार झालेल्या तळ्यात दुपारी तीनच्या सुमारास पोहण्यासाठी गेले. पाण्याचा प्रवाह वेगवान होता, या प्रवाहात दोघेही वाहून गेले. एका प्रत्यक्षदर्शीने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे अर्धा तास शोध घेऊन त्या तरुणांचे मृतदेह बाहेर काढले. जबीर सुलेमान शाह आणि सलमान अयूब शेख अशी मृतांची नावे आहेत. ते मालेगावनजीक निहालनगर येथील रहिवासी आहेत, अशी माहिती पोलिस अधिकारी एस. पी. मोरे यांनी दिली आहे. या तरुणांबरोबर आणखी दोन तरुण असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. मात्र, पोलिसांना त्यांच्याबाबत अद्याप काही आढळले नाही.