Nashik News : दुर्दैवी ! सेल्फी काढणे जिवावर बेतले, धरणात बुडून 6 जणांचा मृत्यू; मृतात 5 मुलींचा समावेश

पोलीसनामा ऑनलाइन – सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात 6 जणांचा धरणात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. 16) सायंकाळी सहाच्या सुमारास नाशिकच्या वालदेवी धरण परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. रात्री उशिरापर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र रात्री उशीर झाल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले. शनिवारी (दि. 17) सकाळी 6 जणांचे मृतदेह बाहेर काढण्य़ात आले असून मृतामध्ये 5 मुलींचा समावेश आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

आरती भालेराव (वय 22), हिम्मत चौधरी (16), नाजिया मनियार ( वय, 19) , खुशी मणियार (वय 10), ज्योती गमे (वय 16) आणि सोनी गमे ( 12, सर्व रा. नाशिक ) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनी गमे हीचा काल वाढदिवस होता. मात्र लॉकडाऊनमुळे सर्वत्र हॉटेल्स बंद असल्याने तिच्या मित्रमैत्रिणीनी धरण परिसरात वाढदिवस साजरा करण्याचा बेत आखला. त्यानुसार 9 मित्रमैत्रिणी केक घेऊन वालदेवी धरण परिसरात गेले होते. मात्र यावेळी पाण्यात उभे राहून सेल्फी काढताना एकाचा पाय घसरला. त्याला वाचवण्यासाठी इतरांनीही पाण्यात उड्या टाकल्या. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू ओढवला.

यात आरती, हिम्मत, नाजिया, खुशी, ज्योती, आणि सोनी गमे आदीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले समाधान वाकळे, प्रदीप जाधव आणि सना नजीर मणियार तिघे सुदैवाने बचावले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत शोध घेतल्यानंतर आरती भालेराव हिचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. मात्र रात्री अंधारात शोधकार्यात अडथळा येत असल्याने थांबविण्यात आले. त्यानंतर शनिवारी सकाळपासूनच पुन्हा शोधकार्य सुरू केले. सकाळी साधारण 9 वाजेपर्यंत बुडालेल्या सर्व 6 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या सर्वांचे मृतदेह नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत.