भांडणाच्या रागातून भर बाजारात तरुणाचा ‘सपासप’ वार करून खून

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – जुन्या भांडणाच्या रागातून 8 जणांच्या टोळक्याने एका तरुणावर चाकूने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भर बाजारात ही घटना घडल्यामुळे सगळा परिसरच हादरून गेला आहे. ही घटना शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास नाशिक जवळील गुरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या घोटी येथिल बाजारात घडली. विनोद तोकडे (वय-20) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाच दिवसांपूर्वी एका हॉटेलवर दोन गटामध्ये वाद झाले होते. याच वादातून हा खून झाल्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. विनोद आणि काही तरुणांचे हॉटेलमध्ये भांडण झाले होते. याचा राग या तरुणांच्या मनात होता. त्यानंतर पाच दिवसांच्या अवधीत आरोपींनी विनोदच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले. त्याची संपूर्ण माहिती त्यांनी काढली.

घोटीमध्ये डांगी जनावरांचा बाजार भरतो. या बाजारात शेकडो नागरिक जनावरांची खरेदी-विक्री करण्यासाठी येत असतात. मृत विनोद गुरांच्या बाजारात येणार असल्याची माहिती आरोपींना मिळाली होती. त्यांनी बाजारात विनोदचा काटा काढण्याचा कट रचला. विनोद बाजारात आला असता 8 जणांच्या टोळक्याने विनोदसोबत वाद घातला. वाद सुरु असतानाच त्याच्यावर हल्ला करून चाकूने सपासप वार केले. विनोद रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून बाजारात आलेल्या नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 8 पैकी 7 जणांना अटक केली आहे.

You might also like