13000 रुपयाची लाच घेताना सिंचन विभागातील सहाय्यक लेखाधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –   पाझर तलावाच्या दुरुस्ती कामाचा धनादेश दिल्याच्या मोबदल्यात 13 हजार रुपयाची लाच घेताना जिल्हा परिषदेतील सिंचन विभागातील सहाय्यक लेखाधिकाऱ्याला अँटी कप्शनच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (मंगळवार) जिल्हा परिषद कार्यालयात करण्यात आली . सुरेंद्र कुमार यशवंत अहिरे (वय- 53) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या सहाय्यक लेखाधिकाऱ्याचे नाव आहे.

याप्रकरणी चाळीसगाव येथील 45 वर्षाच्या व्यक्तीने नाशिक लाचलुपचत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारदार यांनी जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील मौजे बिळखेड येतील पाझर तलावाचे दुरुस्तीचे काम केले होते. या कामाचा 718220 रुपयांचा धनादेश दिल्याच्या मोबदल्यात अहिरे याने तक्रारदार यांच्याकडे 6 जून रोजी 25 हजार रुपयाची लाच मागितली. तडजोर रकमेपैकी 8 हजार रुपये दहा दिवसांपूर्वी अहिरे याला देण्यात आले. लाचेच्या उर्वरित रकमेची अहिरे याने मागणी केली.
तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता तडजोडीत ठरलेल्या उर्वरीत रक्कम 13 हजार रुपये अहिरे याने स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम जिल्हा परिषद कार्यालयात देण्याचे ठरले होते. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयात आज सकाळी सापळा रचून सुरेंद्र कुमार अहिरे याला तक्ररदार यांच्याकडून 13 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. सुरेंद्र कुमार अहिरे याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नाशिक लाचलुपचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रशांत सपकाळे, पोलीस नाईक प्रविण महाजन, प्रकाश महाजन, चालक पोलीस हवालदार संजय पगारे यांच्या पथकाने केली. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.