Nasik News : नगर भूमापकास 30 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

नाशिक : खरेदी केलेल्या घरावर वडिलांचे नाव लावण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करुन ३० हजार रुपये स्वीकारताना नगर भूपामन अधिकारी कार्यालयातील परिरक्षण भूमापकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.
संदीप हरीलाल चव्हाण असे अटक केलेल्या भूमापकाचे नाव आहे.

तक्रारदार यांच्या वडिलांनी घर खरेदी केले आहे. त्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी तक्रारदारांनी अर्ज केला होता. संदीप चव्हाण यांनी तक्रारदारकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक कार्यालयात तक्रार दिली. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याची पडताळणी केली. त्यात संदीप चव्हाण याने तडजोडीअंती ४० हजार रुपये घेण्यास मान्य केले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नगर भूमापन कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच घेताना संदीप चव्हाण याला पकडण्यात आले.