एकनाथ खडसेंनी पुरावे द्यावेत, गिरीश महाजनांचं ‘आव्हान’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांचेच नाही तर सहा जणांचे तिकीट कापले आहे. आपण त्यांना तिकीट देण्यास विरोध केला नव्हता. खडसे यांच्याकडे आम्ही केलेल्या विरोधाचे पुरावे असतील तर त्यांनी द्यावे, असा पलटवार माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.

एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांनी आपले तिकीट कापले असा थेट नाव घेऊन आरोप केला होता. त्यामुळे भाजपामध्ये हा एकच चर्चेचा विषय झाला आहे. यावर बोलताना गिरीश महाजन यांनी सांगितले की, खडसेंचे तिकीट कापण्याचा विषय आपला किंवा फडणवीस यांचा नाही तर तो पक्षतील वरिष्ठांचा होता. कोअर कमिटीच्या बैठकीत आम्ही कोणताही विरोध केला नाही. पक्षाने त्यांचे नाही तर अन्य सहा जणांचे तिकीट कापले होते. आमच्यामुळे तिकीट कापले गेले, या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. खडसे यांच्याकडे आम्ही केलेल्या विरोधाचे पुरावे असतील तर त्यांनी द्यावे, असे महाजन यांनी म्हटले आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहावरुन तत्कालीन विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष करावे अशी शिफारस पक्षश्रेष्ठीकडे केली होती. त्यातूनच फडणवीस यांना राज्यभर काम करण्याची संधी मिळाली. २०१४ मध्ये भाजपा विजयी झाल्यावर प्रदेशाध्यक्ष असल्याने विरोधी पक्षनेता असलेल्या खडसे यांना डावलून फडणवीस यांच्या पारड्यात पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपद बहाल केले.

त्यानंतर आपल्या मार्गातील अडसर असलेल्या खडसे यांच्यावर झालेल्या जमीन खरेदी प्रकरणावरुन त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावला. त्यानंतर त्यांचे महत्व कमी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक गिरीश महाजन यांना बळ दिले. तसेच खानदेशातील विविध महापालिका, नगरपालिका निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवून पद्धतशीलपणे खडसे यांचे खच्चीकरण करण्यात आले होते. त्यातूनच खडसे हे डिवचले गेले होते.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/