नाथाभाऊंचे फडणवीस – महाजनांवर ‘गंभीर’ आरोप, भाजपात प्रचंड ‘खळबळ’ तर पंकजा मुंडे यांच्याकडे सर्वांचे ‘लक्ष’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपले राजकारण संपविण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आपले तिकीट कापले, असा थेट नाव घेऊन एकनाथ खडसे यांनी आरोप केल्याने भाजपामध्ये एकच खळबळ उडाली आहे. इतके दिवस नाथाभाऊ केवळ पक्षातील लोकांनी असे म्हणून नाव घेण्याचे टाळत होते. आता त्यांनी थेट आरोप केल्याने भाजपासह सर्वच राजकीय नेत्यांमध्ये याची चर्चा सुरु झाली आहे.

पंकजा मुंडे यांनी डिसेंबर महिन्यांच्या सुरुवातीला सर्वप्रथम भाजपातील या असंतोषाला वाट करुन दिली होती. त्यांना एकनाथ खडसे, प्रकाश मेहता यांनी साथ दिली होती. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी खडसे हे गोपीनाथगडावरही गेले होते. पंकजा मुंडे यांना पक्षातील लोकांनीच पाडले असे आरोप यापूर्वी झाले आहेत. नाथाभाऊ यांच्या थेट आरोपानंतर आता पंकजा मुंडे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ खडसे यांनी फडणवीस व महाजन यांच्यावर आरोप करताना सांगितले होते की, भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षश्रेष्ठी मला तिकीट देण्यासाठी इच्छुक होते. मात्र, फडणवीस, महाजन यांनीच माझ्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यानंतरही पक्षश्रेष्ठी व कमिटीचे अन्य सदस्य माझ्या नावासाठी आग्रही होते. तरीही फडणवीस, महाजन यांचा विरोध थांबला नाही. ही माहिती कोअर कमिटीच्या सदस्यांनीच आपल्याला दिल्याचे खडसे यांनी सांगितले.

खडसे यांच्या या थेट आरोपामुळे भाजपात सर्व काही आलबेल असल्याचे दाखविले जाते, तसे ते नाही हे आता जाहीर झाले आहे. खडसे यांनी आता जाहीर आरोप केल्याने त्यावर पक्ष म्हणून भाजपा काय दखल घेतात. त्यांनी केलेल्या आरोपावर देवेंद्र फडणवीस कोणती भूमिका घेतात. पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी राहतात की खडसे यांची चौकशी करणार याकडे भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/