नथुराम गोडसे दहशतवादीच, ‘सिद्ध करून हवं असेल तर कोणत्याही चौकात या’ : प्रकाश आंबेडकर

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – देशात नथुराम गोडसेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अभिनेते कमल हासन यांनी नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी असल्याचे म्हंटले होते. त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी नथुराम गोडसे हा व्यक्ती म्हणून दहशतवादीच आहे असल्याचं म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर बहुजन वंचित आघाडीने विधानसभेची व्यूहरचना आखण्यासाठी राज्यभर दौरा सुरू केला आहे. या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक आज कोल्हापुरात पार पडली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोणत्याही माणसाला धर्म जोडणे चुकीचे आहे. तो हिंदू होता म्हणून दहशतवादी आहे असे मी म्हणत नाही या देशात नथुराम गोडसे हा दहशतवादी आहे. याचं कारण म्हणजे कोणालाही कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार नाही, दुसऱ्याचा जीव घ्यायचा तर त्याला दहशवादीच म्हटलं पाहिजे. तसेच कोणाला हे सिद्ध करून हवं असेल तर कोणत्याही चौकात या, असे खुले आव्हानही त्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केले आहे.

आगामी विधानसभेच्या सर्व जागा जनता दल आणि MIM च्या साथीने आपण लढवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. आता युतीसाठी आपण कुणाकडेही स्वतःहून जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच पंतप्रधानपदासाठी कुणाला पाठींबा द्यायचा हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट करू, असं आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय.