निर्भया केस : फाशीच्या आणखी जवळ पोहचले चारही दोषी, विनयची याचिका देखील SC नं फेटाळली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया केसमधील दोषी असलेल्या विनय कुमार शर्माला सर्वोच्च न्यायालयाकडून शुक्रवारी मोठा धक्का बसला. विनयने राष्ट्रपतींनी फेटाळलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात अपील केली होती. न्यायालयाने ही अपील देखील फेटाळून लावली आहे. त्याचप्रमाणे तो मेडीकली फिट असल्याचे देखील न्यायालयाने म्हटले आहे.

विनयची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर चारही दोषी फाशीच्या आणखी जवळ पोहचले आहेत. फाशीपासून वाचण्यासाठी दोषींकडून वेगवेगळे पर्याय वापरण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे. राष्टपतींनी फेटाळलेल्या याचिकेला विनयने न्यायालयात आव्हान दिले होते. यावेळी विनयच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, त्याला जेलमध्ये खूप त्रास दिला गेला त्यामुळे तो मानसिक दृष्ट्या आजारी झाला आहे आणि राष्ट्रपतींकडून या गोष्टीबाबत विचार झाला नसल्याचे वकिलांनी न्यायालयात सांगितले.

सरकारी वकील तुषार मेहता यांनी विनयच्या वकिलांचे दावे फेटाळत सांगितले की, विनय शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि स्वस्थ असल्याचे सांगितले. दोषींच्या वकिलांकडून अनेक तर्क लावून सांगण्याचे प्रयत्न केले गेले.

डिसेंबर 2012 मध्ये, एका 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर दिल्लीत चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिच्यावर रॉडने हल्ला केला गेला होता. विद्यार्थिनीला गंभीर अवस्थेत उपचारासाठी नेण्यात आले होते, तेव्हा तिचा 29 डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. याबाबत सहा आरोपी होते त्यातील एक अल्पवयीन असल्यामुळे त्याला तीन वर्षाची शिक्षा झाली तर एकाने जेलमध्येच आत्महत्या केली. तर बाकी चौघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.