Coronavirus : वैद्यकीय पथकावर हल्ला करणारे 5 आरोपी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   कर्नाटकच्या पडरायनपुरा येथे गेल्या आठवड्यात आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यात अटक झालेल्या 5 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सी.एन.अश्वथ नारायण यांनी शुक्रवारी सांगितले की, तुरूंगात असलेल्या पाच लोकांमध्ये कोरोना संक्रमणाची पुष्टी झाली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात कर्नाटकच्या पडरायनपुरा येथे कोरोना संशयितांना घेण्यासाठी दाखल झालेल्या वैद्यकीय पथकावर स्थानिकांनी हल्ला केला. या प्रकरणात 126 लोकांना अटक करण्यात आली. कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर या सर्वांना जवळच्या रामनगर येथील जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. वैद्यकीय पथक येथे कोरोना संशयितांना क्वारंटाईन केंद्रात शिफ्ट करण्यासाठी पोहोचले होते.

नारायण यांनी पत्रकारांना सांगितले कि, “आम्ही सर्व कैद्यांची चाचणी केली. तपासणी दरम्यान त्यातील पाच जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. पाचही जणांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.” दरम्यान, आरोग्य कर्मचार्‍यांवर किंवा पोलिस कर्मचार्‍यांवर हल्ल्याच्या घटना देशातील बर्‍याच राज्यांत पाहायला मिळाल्या आहेत. सरकार अशा घटनांबाबत कठोर झाले असून असे करणाऱ्यांविरुद्ध पावले उचलत आहेत.

दरम्यान, देशात कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण सतत वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीवरून देशात कोरोना संक्रमणाची संख्या 23 हजारांच्या वर गेली आहे. यापैकी 17,610 लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर 4749 लोकांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच देशातील कोरोना मृतांची संख्या 718 वर पोहोचली आहे. देशात सर्वाधिक बाधित राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. त्याखालोखाल मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, दिल्ली आणि उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. या सर्व राज्यात कोरोना संक्रमणाचा आकडा 1000 च्या वर गेला आहे तर महाराष्ट्रात 5000 हून अधिक लोक संक्रमित झाले आहेत.