मोठा दिलासा ! ‘लॉकडाऊन’ दरम्यानच्या काळात कामगारांना द्याव लागणार पुर्ण वेतन : केंद्रीय गृह मंत्रालय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण देशात झाला आहे. देशामध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूसंदर्भात आरोग्य व गृह मंत्रालयाची आज (रविवार) संयुक्त पत्रकार परिषद झाली. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, आतापर्यंत 979 जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद आहे. यामध्ये 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासामध्ये 106 नवी रुग्णांची नोंद झाली आहे. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

लव अग्रवाल म्हणाले की, राज्यस्तरावरील माहितीवर लक्ष ठेवले जात आहे. गंभीर असलेल्यांची माहिती घेण्यात येत आहे. गंभीर रुग्णांची पार्श्वभूमी तपासली जात आहे. त्या रुग्णाने कोणाकोणाला संपर्क साधला होता याची माहिती मिळवण्यात येत आहे. त्यांच्यावर डॉक्टरांच्या पथकाकडून लक्ष ठेवले जात आहे. लव अग्रवाल यांना पत्रकार परिषदेमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी किती व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत अशी विचारले असता, अग्रवाल यांनी अद्याप याची आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे सांगितले.

गृहमंत्रालयाच्या सचिवांनी सांगितले की, अडकलेल्या मजुरांसाठी जेवण आणि राहण्याची सोय करण्यावर प्राधान्य दिले पाहिजे. यासाठी राज्यांना निधी पुरवला जाणार आहे. तसेच जे कामगार भाड्याच्या घरात रहात आहेत. अशा मजुरांना घरमालक लॉकडाऊनच्या काळात घराच्या भाड्याबद्दल तगादा लावू शकत नाहीत. तसेच त्यांना घर खाली करण्यास देखील सांगू शकत नाहीत. लॉकडाऊन दरम्यान कोणत्याही कामगाराच्या पगारामध्ये कपात न करण्याचे संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती त्यांनी दिली.