Air India Plane Crash : पायलटसह 17 प्रवाशांचा मृत्यू, 100 हुन अधिक जखमी, PM मोदींनी दिलं मदतीचं आश्वासन

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : वंदे भारत मोहिमेअंतर्गत खाडीत अडकलेल्या भारतीयांना घेऊन येणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान केरळच्या कोझिकोड विमानतळावर अपघाताला बळी पडले. मुसळधार पावसामुळे धावपट्टी पाण्याने भरुन गेली होती आणि विमान उतरण्याच्या वेळी सुमारे 50 फूट खोल खड्ड्यात जाऊन पडले. या दुर्घटनेत दोन्ही वैमानिकांसह 17 जणांचा मृत्यू झाला. या विमानात एकूण 190 लोक होते. 174 लोकांची सुटका करण्यात आली आहे. या अपघातात 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. पीएम मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याशी बोलून त्यांना सर्व शक्य त्या मदतीचे आश्वासन दिले.

विमानाचे झाले दोन तुकडे

एअर इंडिया एक्सप्रेसने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, बोईंग 737 विमान दुबईहून कालीकटला येत होते. शुक्रवारी संध्याकाळी कोझिकोड मधील कारीपुर विमानतळाच्या टेबलटॉप रनवे क्रमांक 10 वर शुक्रवारी सायंकाळी 7:41 वाजता उतरताना हा अपघात झाला आणि विमानाचे दोन तुकडे झाले. पहिल्या भागाला अधिक नुकसान झाले.

कसा झाला अपघात

1. लँडिंग दरम्यान पाऊस पडला होता आणि रनवेला पाणी साठलेले होते

2. पावसामुळे दिवेही कमी होते, जे अपघाताचे कारण बनले

3. धावपट्टी संपल्यानंतर विमान पुढे गेले आणि खड्ड्यात पडले

4. विमानाचे दोन तुकडे झाले आणि पुढील भागाचे जास्त नुकसान झाले

5. विमानात आग न लागल्यामुळे मोठ्या संख्येने लोकांचे प्राण वाचले

आग न लागल्यामुळे लोकांचे वाचले प्राण

सुदैवाने विमानात कोणतीही आग न लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे प्राण वाचले. नागरी उड्डाण महासंचालनालय (डीजीसीए) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुदैवाने विमानात आग लागली नाही अन्यथा जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली असती. नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विमानाच्या पुढच्या भागाला मोठे नुकसान झाले आहे.

दीड तासाची मेहनत घेऊन वाचवण्यात आले 174 लोक

एअर इंडिया एक्स्प्रेसने एक निवेदन जारी केले आहे, असे म्हटले आहे की या अपघातात पायलट कॅप्टन दीपक साठे आणि सहकारी पायलट अखिलेश कुमार यांचा मृत्यू झाला आहे. मलप्पुरम जिल्ह्याचे कलेक्टर के. गोपालकृष्णन यांनी सांगितले की जखमींना कोझिकोड आणि मलप्पुरम मधील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, दीड तास चाललेल्या बचावकार्यात सर्व प्रवासी आणि सामान विमानातून बाहेर काढण्यात आले. 174 लोकांची सुटका करण्यात आली आहे.

हेल्पलाइन नंबर जारी

भारत, दुबई आणि शारजाह येथे एअर इंडिया एक्स्प्रेसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना माहिती देण्यासाठी अनेक हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. भारतीय दूतावासाने दुबईमध्ये +97156 543903, +971543090572, +971543090571, +971543090575 जारी केले आहेत. शारजाहसाठी हेल्पलाईन क्रमांक +97165970303 आहे, तर परराष्ट्र मंत्रालयाने 1800 118 797, +91 11 23012113, +91 11 23014104, +91 11 23017905 आणि +91 11 23018158 जारी केले आहेत, हे 24 तास काम करतील.

पीएम मोदी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याशी या विमान अपघाताविषयी फोनवरून माहिती घेतली आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले की, कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्हाधिकारी आणि आयजी अशोक यादव यांच्यासह अधिकाऱ्यांची पथके विमानतळावर बचावकार्यात कार्यरत आहेत. पीएम मोदी म्हणाले आहेत की कोझिकोडमधील विमान अपघातामुळे मी दु:खी आहे. मी त्या लोकांसोबत उभा आहे ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे. मी प्रार्थना करतो की जखमी लवकरात लवकर बरे होतील.

राष्ट्रपतींनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. केरळमधील कोझिकोड येथे एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाच्या अपघातामुळे मी दु:खी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याशी बोलून परिस्थितीची माहिती घेतली आहे. बाधित प्रवासी, क्रू मेंबर्स आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मी प्रार्थना करतो.