University Exam : अंतिम वर्ष वगळता विद्यापीठांचे सर्व विद्यार्थी विना परीक्षा होतील ‘प्रमोट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना संसर्गाने सर्वत्र हाहाकार उडाला असल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) सध्या परीक्षांबाबत निर्णय विद्यापीठांवर सोडला आहे. ते स्थानिक परिस्थिती पाहून परीक्षा घेणे किंवा विद्यार्थ्यांना थेट प्रमोट करण्याचा निर्णय घेऊ शकतात. मात्र, आतापर्यंत जी स्थिती आहे, त्यामध्ये बहुतांश विद्यापीठांनी अंतिम वर्ष सोडून बाकी सर्व विद्यार्थ्यांना विना परीक्षा पुढील वर्गात प्रमोट करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी विद्यापीठांनी युजीसीकडून मागच्या वर्षी परीक्षांसाठी ठरवलेल्या गाईडलाईनला आधार घेतला आहे.

यूजीसीचे सचिव डॉ. रजनीश जैन यांच्यानुसार, विद्यापीठे स्वायत्त संस्था असतात. अशावेळी त्यांना परीक्षा आणि शैक्षणिक सत्र इत्यादी बाबत आपल्या स्तरावर कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार आहे. यूजीसीचे म्हणणे आहे की, कोरोना संसर्गाचा प्रभाव देशाच्या विविध भागात कमी-जास्त आहे. अशावेळी परीक्षांबाबत यावेळी कोणतीही स्टँडर्ड गाईडलाईन बनवण्यात आलेली नाही.

दरम्यान, विद्यापीठांनी पदवीच्या पहिल्या आणि दुसर्‍या वर्षाच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत आकलन किंवा मागील वर्षाच्या कामगिरीच्या आधारावर गुण देऊन प्रमोट करण्याची तयारी सुरू केली आहे. सोबतच अंतिम वर्षच्या परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्याच्या योजनेवर सुद्धा काम सुरू आहे. मात्र, अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत कोणताही निर्णय जूनच्या पहिल्या आठवड्यात कोरोना संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतरच घेतला जाईल.

सीबीएसई दोस्त फॉर लाईफ अ‍ॅप

सीबीएसईने विद्यार्थ्यांचा मानसिक तणाव पाहता सीबीएसई दोस्त फॉर लाईफ अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थी अणि पालकांना मानसिक समुपदेशन दिले जाईल. हे अ‍ॅप विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेईल आणि त्यांना 12वीच्या नंतर करियर पर्यायासंबंधी सल्ला सुद्धा देईल.