होय, भारतातील ‘या’ राज्यात ‘कोरोना’ संक्रमणानं मृत्यू झालेल्याचा अंत्यसंस्कार केल्यास मिळणार 15 हजार रूपये

हैदराबाद : वृत्तसंस्था – कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार करण्याबाबतही राज्य सरकारला बरीच अडचण येत आहे. अशात आंध्र प्रदेश सरकारने कोविड-१९ मुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्य संस्कारांसाठी १५,००० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. कुटुंबाने अंत्यसंस्कार केल्यास त्यांना ही रक्कम मिळेल, तसेच अंत्यसंस्कार करणाऱ्या महानगरपालिका/ पंचायत कर्मचार्‍यांनाही दिली जाऊ शकते. आंध्र प्रदेशचे आरोग्य व कुटुंब कल्याण आयुक्त काटामानेनी भास्कर यांनी सांगितले की, कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करणाऱ्याला १५ हजार रुपयांची रक्कम सरकारकडून देण्यात येईल.

आंध्र प्रदेशात कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहासह दुर्व्यवहाराच्या घटना सतत समोर येत आहेत. अलीकडेच ७२ वर्षीय कोरोना बाधित वृद्ध व्यक्तीचा मृतदेह त्याच्या घरापासून स्मशानभूमीत जेसीबी मशीनमध्ये नेण्यात आला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला, ज्यामध्ये जेसीबी चालवणाऱ्याने पीपीई किट्स परिधान केलेले दिसून आले. या घटनेवरून विरोधकांनी गोंधळ घातला, त्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे.

विरोधकांकडून टीका झाल्यानंतर मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी या घटनेला अमानुष घटना म्हणत कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. ते म्हणाले होते की, अशा प्रकरणात काम करण्याचा प्रोटोकॉल स्पष्ट आहे. पीडिताला शिफ्ट करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रोटोकॉलचे पालन केले गेले नाही. मात्र या कर्मचार्‍यांविरुद्ध काय कारवाई केली गेली, हे कळू शकले नाही. आता राज्य सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी १५,००० रुपये देण्याची घोषणा केली आहे. अशी अपेक्षा आहे की, यापुढे मृतदेहांसह राज्यात गैरवर्तन होणार नाही.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) स्पष्ट केले आहे की, मृत्यूनंतर शरीरातील कोरोना व्हायरस काही तासांनंतर नष्ट होतो. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नसते. परंतु असे असूनही या प्राणघातक विषाणूबद्दल लोकांमध्ये खूप भीती आहे, ज्यामुळे कोरोना संक्रमित व्यक्तींच्या मृत शरीराला स्पर्श करत नाही.