हज यात्रेला जाणार्‍या सर्व यात्रेकरूंना कोरोना व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतल्यानंतरच मिळेल परवानगी, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – वार्षिक हज यात्रेला जाणार्‍या सर्व मुस्लिम बांधवांना कोरोना व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतल्यानंतरच यात्रेची परवानगी दिली जाणार आहे. हज कमेटी ऑफ इंडियाने याबाबत माहिती दिली आहे. वेगाने पसरत असलेल्या कोरोना महामारीच्या दरम्यान यावर्षीच्या हज यात्रेची घोषणा करण्यात आली आहे.

तर सौदी सरकारने कोरोनाचा प्रकोप पहाता 72 तासांसाठी सर्व लोकांना क्वारंटाइन करण्याचा आदेश दिला आहे. शारीरिक अंतरासह अन्य नियमांचे पालन करण्यासह मास्क घालणे बंधनकारक असेल. रहिवाशी ठिकाणी एक ते दिड मीटरचे अंतर राखावे लागेल.

मागच्या वषी झाली नाही यात्रा
वेगाने पसरणार्‍या कोरोना महामारी दरम्यान यावर्षी हज यात्रेची घोषणा करण्यात आली आहे. जागतिक स्तरावर पुन्हा एकदा महामारी पसरत असताना हज यात्रेचे स्वरूप कसे असेल, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. मागच्या वर्षी ही यात्रा होऊ शकली नव्हती.

19 किंवा 20 जुलेला होणार आहे हज यात्रा
19 किंवा 20 जुलै 2021 ला हजचा फर्ज अदा होणार आहे, परंतु कोरोनामुळे सौदी सरकारने अजूनपर्यंत हे ठरवलेले नाही की किती लोकांना हज यात्रेत सहभागी होण्याची परवानगी दिली जाईल. महामारीमुळे सौदी अरबने भारतासह 20 देशांच्या लोकांवर अजूनपर्यंत अस्थायी प्रतिबंध लावलेला आहे.