कर्नाटक : वृत्तसंस्था
कर्नाटकात मागील चार दिवसापासून सुरु असलेले राजकीय नाट्य सुरूच आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या येडियुरप्पा यांना आज बहुमत सिद्ध करायचे होते परंतु ते सिद्ध करण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला. यांनतर सभात्याग करत त्यांनी राष्ट्रगीताला न थांबता राष्ट्रगीत सुरु असताना सदन सोडले, यावर राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली आहे.
शपथ ग्रहनानंतर सुप्रीम कोर्टाने येडियुरप्पांना शनिवारी दुपारी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर आमदारांचा शपथविधी झाला. यानंतर झालेल्या भाषणात आपण राजीनामा देत असल्याची घोषणा येडियुरप्पा यांनी केली. यावेळी सभागृहाच्या कामकाजाची सांगता करताना प्रथेप्रमाणे राष्ट्रगीत सुरू करण्यात आले. परंतु, राष्ट्रगीताला न थांबता राष्ट्रगीत सुरू असतानाच येडियुरप्पा व भाजपचे सर्व आमदार सदन सोडून निघून गेले. या घटनेचे सर्व छायाचित्रण लाईव्ह सुरु होते.
यानंतर राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रगीतावरून भाजपवर निशाणा साधला. राष्ट्रगीत सुरू असताना भाजपचे आमदार कर्नाटक विधानसभेतून निघून गेल्याचे देशातील जनतेने टीव्हीवर पाहिले आहे. हा राष्ट्रगीताचा अवमान असून , भाजप हे संघ भारतातील घटनात्मक संस्थाचं महत्त्व संपवू पाहत असल्याचे हे द्योतक आहे. आमचा लढा याविरोधातच असून हा लढा यापुढेही सुरू राहील, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले. यावेळी राहुल गांधी यांनी भाजप तसेच पंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली.