Video : ओवैसींचा आझाद यांच्यावर निशाणा, म्हणाले – ‘तुमचेच नेते तुमच्यावर भाजपाशी हातमिळवणी केल्याचा आरोप करताहेत, कधीपर्यंत करणार गुलामी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकी (सीडब्ल्यूसी बैठक) दरम्यान एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी गुलाम नबी आझाद यांच्यावर निशाणा साधला आहे. ओवेसी म्हणाले की, गुलाम नबी आझाद जेव्हा हैदराबादला येत असत तेव्हा ते माझ्यावर व माझ्या पक्षावर आरोप करत की, तुम्ही भाजपाला पाठिंबा देत आहात. ते म्हणायचे की, आम्ही भाजपची ‘बी’ टीम आहोत. आज त्यांच्या पक्षातील राहुल गांधी त्यांना म्हणाले आहेत की, तुम्ही पक्षाच्या पत्रावर सही करून भाजपला पाठिंबा दर्शवला. गुलाम नबी आझाद यांना ते किती काळ कॉंग्रेसची गुलामगिरी करणार याचा विचार करावा लागेल.

ओवेसी म्हणाले की, गुलाम नबी आझाद गेली ४५ वर्षे कॉंग्रेस पक्षात आहेत. आज त्यांचे नेते स्वत: त्यांच्यावर आरोप करत आहेत की, ते भाजपला पाठिंबा देत आहेत. स्वत: गुलाम नबी आझाद यांनी माध्यमांना सांगितले की, मी जर भाजपसोबत असेल तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. यावरून हे सिद्ध झाले आहे की, जर तुम्ही कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला विरोध केला तर तुम्हाला भाजपमध्ये आणले जाईल. आता त्या मुस्लिम नेत्यांना विचार करावा लागेल, जे कॉंग्रेस पक्षात आपला वेळ वाया घालवत आहेत. जेव्हा तुमच्यावर आरोप होत आहेत, तुम्ही किती काळ अशी गुलामगिरी करत राहणार?