काळवीट शिकार प्रकरण : सैफ अली खान, सोनालीसह ‘या’ ५ जणांना हायकोर्टाची नोटीस

जयपूर : वृत्तसंस्था – बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणात अडकलेल्या आरोपींच्या अडचणीत वाढ झाली आहे. काळवीट शिकार प्रकरणात राजस्थान उच्च न्यायालयाने सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, नीलम, तब्बू आणि दुष्यंत सिंह यांना कोर्टाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. सीजेएम कोर्टाने यांना बंदी घालण्याविरुद्ध राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने नोटीस पाठविली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी ८ आठवड्यांनंतर होणार आहे.

काय आहे काळवीट शिकार प्रकरण ?

जोधपूरमध्‍ये १९९८ रोजी ‘हम साथ साथ है’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. दरम्‍यान, चित्रपटातील स्‍टार्स म्‍हणजेच सलमान खान, सैफ अली, तब्‍बू, सोनाली बेंद्रे आणि निलम हे जंगलात गेले. तेथे सलमानने काळवीटांची शिकार केली. ही घटना १ आणि २ ऑक्‍टोबर १९९८ रोजी कांकाणी गावात घडली होती. दोन काळवीटांची शिकार केल्‍याचा आरोप सलमान खानवर होता.

हे प्रकरण न्‍यायालयात गेलं. न्‍यायालयात साक्षीदारांनी सांगितलं की, त्‍यावेळी सलमान खान आणि इतर स्‍टार्स जिप्‍सी गाडीत होते. त्‍या स्‍टार्सनी सलमानला काळवीटची शिकार करण्‍यास सांगितले होते. यानंतर बंदुकीच्‍या गोळीचा आवाज ऐकून सर्व गावातले लोक एकत्र जमले होते. लोक तिथे आल्‍यावर सलमान गाडी घेऊन पळून गेला होता. दोन्‍हीही मृत काळवीट तेथेच पडले होते. या प्रकरणात ५ एप्रिल २०१८ रोजी सलमान खानला दोषी ठरवण्यात आले होते.

काळवीट शिकार प्रकरण – घटनाक्रम

२ ऑक्टोबर १९९८ – वनविभागाकडून तक्रार दाखल करण्यात आली.
एकूण ७ आरोपी – सलमान, सैफ, सोनाली बेंद्रे, नीलम, तब्बू, दुष्यंत सिंग आणि दिनेश गावरे
९ नोव्हेंबर २००० – न्यायालयाने तक्रारीची दखल घेतली
१९ फेब्रुवारी २००६ – आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्यात आले
२३ मार्च २०१३ – ट्रायल कोर्टाने सुधारणा आरोप निश्चित केले
२३ मे २०१३ – मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुनावणीला सुरुवात
फिर्यादी पक्षाने २८ साक्षीदारांची साक्ष नोंदवली
१३ जानेवारी २०१७ – साक्षीदारांची साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण
२७ जानेवारी २०१७ – जबाब नोंदवण्यासाठी सर्व आरोपी न्यायालयात हजर झाले
१३ सप्टेंबर २०१७ – फिर्यादी पक्षाकडून अखेरच्या युक्तिवादाला सुरुवात
२८ ऑक्टोबर २०१७ – बचावपक्षाकडून अखेरच्या युक्तिवादाला सुरुवात
२४ मार्च २०१८ – ट्रायल कोर्टातील युक्तिवाद संपला.
२८ मार्च २०१८ – ट्रायल कोर्टाने निर्णय राखून ठेवला
५ एप्रिल २०१८ – सलमान खान दोषी, इतरांची निर्दोष मुक्तता