मतदानासाठी बॉलीवूड स्टार रस्त्यावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यामध्ये मुंबईसह राज्यातील १७ मतदारसंघात आज मतदान होत आहे. मतदानासाठी बॉलीवूड तारेतारकांनी मतदानासाठी घराबाहेर पडून मतदान केले आहे. त्याचबरोबर उद्योगपती, प्रशासकीय अधिकारी यांनीही उत्साहाने मतदानात सहभाग नोंदविला.

अमीर खान, माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर, रेखा, परेश रावल यांनी आज सकाळीच मतदान केले. उद्योगपती अनिल अंबानी हे दररोज फिरायला जातात. मागील वेळी त्यांनी माॅर्निंग वॉक केल्यानंतर तशाच पेहराव मतदान केंद्रावर जाऊन सकाळीच मतदान केले होते. यंदा मात्र अनिल अंबानी यांनी आज सकाळी साडेसात वाजता साध्या वेशात येऊन मतदान केले.

बीसीसीआयमध्ये प्रवेश मिळावा, म्हणून बारामती ऐवजी मुंबईचे रहिवासी झालेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ताडदेव येथे आज मतदान केले. गुजरातमधील खासदार पण यंदा निवडणुकीपासून दूर राहिलेले खासदार परेश रावल यांनी आपली पत्नी स्वरुप संपत यांच्यासह विलेपार्ले येथे मतदान केले.

उत्तर मुंबईमधील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोडकर यांनी वांद्रा येथे मतदान केले. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी बांद्रा येथे सकाळीच येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. अमीर खान आणि त्यांची पत्नी किरण राव यांनी बांद्रा येथे मतदान केले. ज्येष्ठ अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने जुहू येथे सकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला. प्रसिद्ध भोजपूरी अभिनेते आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघातून रवी किशन हे भाजपचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवत आहेत. त्यांनी आज गोरेगाव येथे मतदानाचा हक्क बजावला.

रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी परेड रोड येथे मतदान केले. तसेच एचडीएफसी बँकेचे चेअरमन दीपक पारेख यांनीही परेड रोड येथे मतदान केले.