सोनिया गांधी, राहुल गांधी आणि कमलनाथ यांच्या चीनी लिंकवरून CBI चौकशीची मागणी

भोपाळ : पोलीसनामा ऑनलाइन  –  मध्य प्रदेशचे मंत्री कमल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र पाठवून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याविरूद्ध चीनसोबत त्यांचे संबंध आणि आर्थिक व्यवहारांबाबत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

आपल्या पत्रात, पटेल यांनी काँग्रेस नेते आणि तत्कालीन केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्री कमलनाथ यांच्याविरूद्ध सीबीआय चौकशीची मागणी करत आरोप केला आहे की, राजीव गांधी फाऊंडेशनला चीनी दूतावासाकडून देणगी मिळाली होती, ज्यामुळे त्यांनी चीनला आयातीवर सूट दिली. पटेल यांनी पत्रात लिहिले की, चीनसोबत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि कमलनाथ यांचे संबंधच नव्हे, तर आर्थिक व्यवहार आणि त्यांच्या संपत्तीबाबतही सीबीआय चौकशी झाली पाहिजे, जेणेकरून काँग्रेस पक्षाचे खरे रूप लोकांसमोर येईल.

पटेल यांनी पुढे म्हटले की, चीनसोबतच्या सीमावादावरून मागील अनेक दिवसांपासून काँग्रेस पार्टी बेछूट वक्तव्य करत आहे. पटेल यांनी लिहिले आहे की, मीडियाकडून आतापर्यंत मिळालेल्या माहितीचा विचार करता, चीन आणि तत्कालीन यूपीए सरकारच्या जवळच्या संबंधांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तसेच, त्यांनी पुढे लिहिले आहे की, सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली राजीव गांधी फाऊंडेशनला देणगीच्या नावावर पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या दुतावासाकडून कोट्यवधी रूपयांचे अर्थ सहाय्य मिळाले आणि चीनसोबत सीमा वादाच्या वेळी काँग्रेसचे नरम धोरणाचे कारण हेच अर्थसहाय्य आहे?