केंद्र सरकारकडून NIA ला केरळ सोने तस्करी प्रकरणाचा तपास करण्याची परवानगी, फरार स्वप्ना सुरेश पोहचली कोर्टात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळमध्ये डिप्लोमॅटिक बॅगमध्ये सोने तस्करी प्रकरणाचा तपास आता एनआयए करणार आहे. गृहमंत्रालयाने एनआयएला याचा तपास सुरू करण्यास सांगितले आहे. तर केरळ सरकारने केंद्राच्या आदेशाचे स्वागत केले आहे. केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून प्रकरणाचा तपास केंद्रीय एजन्सीकडून करण्याची विनंती केली होती. केसमधील मुख्य संशयित स्वप्ना सुरेशची विजयन यांच्यासह सत्ताधारी डाव्या नेत्यांशी असलेली जवळीक पाहता, विरोधक मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तर स्वप्नाने अटकपूर्व जामीनासाठी केरळ हायकोर्टात अर्ज केला आहे.

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील प्रकरण
गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले की, हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील आहे. हे पाहता याचा तपास एनआयएकडून करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. एनआयए दहशतवादी आणि राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी गुन्ह्यांचा तपास करणारी एजन्सी आहे. शुक्रवारी या प्रकरणात एफआयआर दाखल केल्यानंतर एनआयए आपला तपास सुरू करेल. प्रकरण संयुक्त अरब अमीरात (यूएई) च्या केरळ येथील कॉन्सुलेटसाठी पाठवण्यात आलेल्या डिप्लोमॅटिक बॅगमध्ये 15 कोटी रूपयांच्या 30 किलो सोने मिळण्याचे आहे.

स्वप्ना सुरेशवर संशय
कस्टम विभागानुसार, राज्य सरकारच्या आयटी विभागाशी संबंधित फर्ममध्ये सल्लागार म्हणून काम करणारी स्वप्ना सुरेशची यामध्ये मुख्य भूमिका आहे, कारण ती या डिप्लोमॅटिक बॅगबाबत कस्टम विभागाकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होती. प्रकरण समोर आल्यानंतर केरळचे मुख्य सचिव एम शिवशंकर यांना पदावरून हटवण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालय आणि सरकारचे वरिष्ठ अधिकारी संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यासाठी कस्टमच्या अधिकार्‍यांवर दबाव आणत होते, असे म्हटले जात आहे.

केरळ सरकारकडून निर्णयाचे स्वागत
केरळचे मंत्री ईपी जयराजन यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले की, तस्करी प्रकरणात राष्ट्रीय तपास एजन्सी (एनआयए) तपासाच्या निर्णयाचे स्वागत करतो. केंद्रीय एजन्सीद्वारे कोणत्याही तपासाचे स्वागत आहे. तपास निष्पक्ष झाला पाहिजे, जेणेकरून सत्य समोर येईल. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी स्वत: प्रकरणाचा तपास एनआयएकडून करण्याची मागणी केली होती.

स्वप्ना पोहचली हायकोर्टात
परदेशी डिप्लोमॅटच्या नावावर सोने तस्करी प्रकरणात अन्य केंद्रीय एजन्सीजने सुद्धा कारवाईचा वेग वाढवला आहे. एजन्सीजने फरार आरोपी व केरळचे सूचना आणि तंत्रज्ञान (आयटी) विभागाची माजी कर्मचारी स्वप्नाचा शोध घेण्यासाठी राज्य पोलीसांचे सहकार्य मागितले आहे, तर स्वप्नाने अटकपूर्व जामीनासाठी केरळ हायकोर्टात अर्ज केला आहे. तिकडे, काँग्रेसने गुरुवारी सुद्धा राज्यव्यापी निदर्शने करून मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

एजन्सीने मागितले सहकार्य
सूत्रांनी सागितले की, केंद्रीय एजन्सीजने केरळ पोलिसांना पत्र लिहून प्रकरणातील स्वप्ना आणि तिच्या निकटवर्तीयांवर नजर ठेवण्यासाठी तांत्रिक सहकार्य मागितले आहे. तर, वकील राजेश कुमार टीके यांच्या माध्यमातून हायकोर्टमध्ये दाखल ऑनलाइन अर्जात स्वप्नाने म्हटले, संयुक्त अरब अमीरात (यूएई) चे कार्यवाहक महावाणिज्य दूत राशिद खमीस अल शिमिली यांनी याचिकाकर्त्याला 30 जूनला कार्गोद्वारे येणार्‍या आपल्या सामानाला उशीर होण्याच्या कारणांचा शोध घेण्यास सांगितले होते. दुसर्‍या दिवशी सुद्धा त्यांनी सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क करून निर्देश दिले. स्वप्नाने अधिकृत जबाबदारीचा वापर करून सीमा शुल्क विभागाच्या सहायक आयुक्तांशी संपर्क साधला आणि त्या सामानाबाबत चौकशी केली. याचिकाकर्त्याचा सोने तस्करीशी काहीही संबंध नाही, असे यामध्ये म्हटले आहे.

विरोधकांनी मागितला राजीनामा
काँग्रेसने राज्यात राज्यव्यापी आंदोलन सुरू केले असून विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी म्हटले की, तस्करांना सहकार्य करणारा आरोपी, माजी मुख्य सचिवांना वाचवण्याचा प्रयत्न करणार्‍या मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही.

राज्य भाजपा प्रमुख के. सुरेंद्रन यांनी म्हटले की, विजयन जनतेला मूर्ख बनवत आहेत. त्यांनी फरार महिलेचा भाजपाशी संबंध असल्याच्या मुद्दा फेटाळला. पार्टी प्रवक्ता बी. गोपालकृष्णन यांनी म्हटले की, काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी परदेशी दूतावासात नोकरीसाठी स्वप्नाच्या नावाची शिफारस केली होती.

आयटी विभाग सचिवाला हटवले
5 जुलैरोजी सीमा शुल्क विभागाने तिरुअनंतपुरम विमानतळावर डिप्लोमॅटच्या नावावर एयर कार्गोद्वारे आलेल्या सामानासोबत 30 किलोग्रॅम सोने जप्त केले होते. याप्रकरणात विभाग यूएई महावाणिज्य दूतावासाचा कथित माजी कर्मचारी सारिथ यास अटक झाली आहे. आयटी विभागााचे सचिव एम. शिवशंकर यांना दोन्ही पदावरून हटवण्यात आले आहे.

यूएई मिशनने दिला सहकार्याचे आश्वासन
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले की, सोने तस्करी प्रकरणाची यूएई दूतावासाला माहिती दिली आहे. यूएई मिशनने प्रकरणाच्या तपासात सर्वप्रकारची मदत करण्याचा विश्वास दिला आहे. यूएईने बुधवारी आपल्याकडून प्रकरणाची चौकशी सुरू केल्याची घोषणा केली आहे.