केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय कमी करण्याविषयी सरकारने सांगितली ‘ही’ महत्वाची गोष्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्तीचे वय कमी करण्याची कोणतीही योजना नाही. कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी रविवारी माध्यमांमध्ये येणाऱ्या वृत्तांचं खंडनही केलं. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय 60 वर्षे आहे. सरकारने सरकारी कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्तीचे वय 50 वर्षांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे अशा वृत्तांचा निषेध करत सिंह यांनी एक निवेदन जारी केले.

माध्यमांचा एक भाग चुकीची माहिती पसरवत आहे

मंत्री म्हणाले की सेवानिवृत्तीचे वय कमी करण्याच्या कोणत्याही प्रस्तावावर सरकारच्या कोणत्याही स्तरावर चर्चा झालेली नाही. सिंह म्हणाले, काही प्रवृत्त घटक आहेत, जे गेल्या काही दिवसांमध्ये माध्यमांच्या एका भागास अशी चुकीची माहिती पसरवित आहेत. ते अशा बातम्यांसाठी सरकारी स्त्रोत किंवा कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला जबाबदार ठरवतात.

सरकारच्या चांगल्या कामाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न

सिंह म्हणाले, ‘हे दुर्दैव आहे की जेव्हा देश कोरोना विषाणूच्या संकटाला तोंड देत आहे, तेव्हा काही घटक आणि निहित स्वार्थी लोक मीडिया स्टोरी तयार करून सरकारच्या चांगल्या कामांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.’ याउलट, कोरोना विषाणूच्या आव्हानाला सुरुवात झाल्यापासून, सरकार आणि कार्मिक विभाग यांनी कर्मचार्‍यांचे हित जपण्यासाठी त्वरित निर्णय घेतले आहेत.