‘राष्ट्रीय महिला आयोग कोण्या एका पक्षाचा असू शकत नाही’ : मंत्री यशोमत ठाकूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांचा दौरा महाराष्ट्राचा अपमान करण्याच्या हेतूनेच आखण्यात आला होता. राष्ट्रीय महिला आयोग हा कोण्या एका पक्षाचा असूच शकत नाही. महिला आयोग हा सर्वांचा असतो, अशा शब्दांमध्ये राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आयोगाच्या अध्यक्षा शर्मा यांच्यावर निशाणा साधला.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा या महाराष्ट्र दौऱ्यावर होत्या. त्यांनी आपल्या नियोजित कार्यक्रम दौऱ्यात मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासोबतची भेट ठरवली नाही. मात्र, अचानक त्यांना रात्री भेटीची वेळ मागण्यात आली. तेव्हा मंगळवारी सकाळची ११ वाजताची वेळ मंत्री कार्यालयातून त्यांना देण्यात आली. त्यानुसार मंत्री ठाकूर शर्मा यांची वाट पाहत बसल्या. पण दुपारी बारा वाजले तरी रेखा शर्मा बैठकीसाठी आल्याचं नाही. तद्वतच, त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना कोविड सेंटरमध्ये महिलांच्या छेडछाडीवर उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे विधान केले. परंतु, शर्मा यांनी कोविड सेंटरला भेट देण्याचा आपला कार्यक्रमही रद्द केला. सोमवारी दिवसभर त्या भाजपच्या महिला नेत्यांच्या भेटी तर मंगळवारी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट घेतली.

दरम्यान, याबाबत बोलताना ठाकूर यांनी म्हटलं की, महिला सुरक्षेच्या संदर्भात ठोस आणि वेगळा कार्यक्रम ठरवून हा दौरा होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. कोनतीही आकडेवारी नसताना अशा प्रकारे महाराष्ट्राबद्दल बदनामीकारक विधान करणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी नाराजी दर्शवली.

बदनामी करणे चुकीचे

रेखा शर्मा यांनी माध्यमांना बोलताना महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या घटना वाढत असल्याचा आरोप केला होता. त्यावर ठाकूर यांनी कोणतेही आकडेवारी नसताना, अशा प्रकारे महाराष्ट्राबाबत बदनामीकारक विधाने करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले.