Corona Stores : 60 च्या दशकापासून कोलकातामध्ये ‘कोरोना’, जागतिक ‘महामारी’ नंतरआलं चर्चेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनामुळे जगभरातील व्यवसाय ठप्प आहे, परंतु कोलकातामध्ये 60 च्या दशकापासून कोरोना नावाने एक व्यवसाय सुरु आहे. कोरोना हा केवळ व्हायरसच नाही तर कोलकातामध्येही एक मोठा ब्रँड आहे. तिथे कोरोना नावाचे एक नाही तर तीन पाळीव प्राणी स्टोअर आहेत, जिथे पाळीव कुत्रे आणि मांजरींना लागणार्‍या सर्व गरजेच्या वस्तू एकाच छताखाली मिळतात. त्यांची औषधे आणि लस देखील उपलब्ध आहेत.

28 वर्षाचे ‘कोरोना’चे व्यवस्थापक विक्रमजित चट्टोपाध्याय म्हणाले की, ‘ सन 1957 मध्ये सनत कुमार बसू रॉय नावाच्या व्यक्तीने न्यू मार्केट भागात ‘मेरठ स्पोर्ट्स’ नावाच्या क्रीडा वस्तूंचे दुकान सुरू केले आणि 1957 मध्ये त्यांचा मुलगा राम कृष्ण बसू रॉयने स्टोअरचे नाव ‘कोरोना’ असे ठेवले. त्या वेळी, कोरोना हा गोल्फ पिशव्याचा एक प्रमुख ब्रँड होता आणि या स्टोअरमधून ते देशभरात पुरविले जात असे.

मेरठ स्पोर्ट्समध्ये पाळीव कुत्री आणि मांजरींचे काही सामान देखील उपलब्ध होते. 1979 मध्ये रामकृष्ण बसू रॉय यांच्या निधनानंतर त्यांचा मोठा मुलगा उदय कृष्णा बसू रॉय यांनी स्टोअर सांभाळण्याची जबाबदारी घेतली. त्यानंतर उदय कृष्णा काही काळ परदेशात गेले तेव्हा त्याचा धाकटा भाऊ कुमार कृष्णा बसू रॉय यांनी त्या स्टोअरची जबाबदारी स्वीकारली.

कुमार कृष्णाच्या नेतृत्वात व्यवसायाचे स्वरूप देखील बदलले. क्रीडा वस्तूंच्या दुकानातून ते पूर्णपणे पाळीव प्राण्यांच्या दुकानात रूपांतरित झाले आणि हळूहळू कोरोनाने ब्रँडचे रूप धारण केले. आज कोलकातासह पूर्व भारतात पाळीव कुत्रा-मांजरीच्या आवश्यक वस्तूंचा तो सर्वात जुना आणि अग्रगण्य ब्रँड आहे. आज कोरोनाच्या ग्राहकांच्या यादीमध्ये आर्मी, पॅरा मिलिटरी फोर्स, बीएसएफ, आरपीएफ, सीआयएसएफ, कोलकाता पोलिस इत्यादींचा समावेश आहे. पाळीव कुत्रा-मांजरीचे पदार्थ आणि पूरक आहार, पोशाख वस्तू, प्रशिक्षण उपकरणे, खेळणी, ड्रेस इत्यादी येथे उपलब्ध आहेत.

विक्रमजीत पुढे म्हणाले की, मानवजातीच्या प्रारंभापासूनच कोरोना विषाणू अस्तित्वात आहे. कोविड -19 हे त्याचे वेगळे रूप आहे, जे नुकतेच विकसित झाले आहे आणि अत्यंत संक्रामक आहे. फारच कमी लोकांना माहित आहे की कोरोनाचा अर्थ ‘फुलांचा मुकुट’ देखील आहे. आमच्याकडे कुत्री आणि मांजरींच्या ‘ हेड टू टेल’ पर्यंत आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत, म्हणूनच त्यांच्यासाठी हा फुलांचा मुकुट आहे.

महाराष्ट्र, ओडिशा, झारखंड, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर यासह अनेक राज्यांमध्ये कोरोना उत्पादनांचा पुरवठा केला जातो. न्यू मार्केट व्यतिरिक्त, कोरोनाचे ईस्टर्न मेट्रोपॉलिटन बायपास आणि कंट्री पार्कमध्ये स्टोअर्स आहेत.

विक्रमजीत म्हणाले – स्टोअरचे नाव ‘कोरोना’ असल्यामुळे आजकाल आम्हाला बरेच कॉल येत आहेत. काही कुतूहलाने हाक मारतात तर काहीजण चेष्ठेने. काही लोक कॉल करतात आणि विचारतात की, आपल्या दुकानाचे नाव कोरोना कसे पडले, आणि काही लोक विनोदीपणे म्हणतात की, हा विषाणू आपण पसरवलेला तर नाही ना. काहीजण असेही विचारतात की, याची लस आपण तर नाही बनवत ना? आम्ही या कॉलला सहजतेने घेतो.