Coronavirus : ‘कोरोना’चं नव्हे तर ‘या’ 4 राज्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’ आणि ‘स्वाइन फ्लू’चा देखील ‘धोका’, अनेक प्रकरण आली समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोना व्हायरसचा धोका वाढत चालला असतानाच आणखी दोन जीवघेण्या व्हायरसने शिरकाव केला आहे. भारतात कोविड-19 सोबतच बर्ड फ्लू (एच5एन1) आणि स्वाइन फ्लू (एच1एन1) ची प्रकरणे समोर आली आहेत. कोरोना व्हायरसप्रमाणे सध्या बर्ड फ्लूची सुरूवातसुद्धा केरळमधून झाली आहे. केरळ सरकारने परप्पनंगडीमध्ये बर्ड फ्लू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शनिवारी कोंबड्या मारण्याचा आदेश दिला. केरळच्या कोझिकोडमध्ये सुद्धा आठ मार्चला बर्ड फ्लूची दोन प्रकरणे समोर आली होती. केरळशिवाय उत्तर प्रदेश, बिहार व पश्चिम बंगालमध्ये मागच्या काही दिवसात बर्ड फ्लू आणि स्वाइन फ्लूचे संशयित प्रकार समोर आले आहेत. यामुळे या तीन राज्यात कोरोनासह बर्ड फ्लू व स्वाइन फ्लूचा धोकाही वाढला आहे.

कोरोना व्हायरसचे एकुण 84 रूग्ण, दोघांचा मृत्यू
भारतात कोरोना व्हायरसच्या एकुण रूग्णांची संख्या शनिवारी दुपारपर्यंत 84 झाली आहे. या व्हायरसमुळे देशात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसचा प्रकोप देशातील 13 राज्यांमध्ये पसरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यास महामारी घोषित केल्याने अनेक राज्यांनी यास महामारी घोषित करून शाळा, कॉलेज, मॉल, सिनेमा घर, स्वीमिंग पूल व जिमसारखी गर्दीची ठिकाणे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. यास तोंड देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अशातच स्वाइन फ्लू व बर्ड फ्लूने अडचणीत आणखी भर टाकली आहे.

केरळातील दोन ठिकाणी बर्ड फ्लू
केरळ सरकारने बर्ड फ्लूचे केंद्र परप्पनंगडी व कोझिकोडमध्ये एक किलोमीटरच्या परिसरातील सर्व कोंबड्या मारण्याचे आदेश दिले आहेत. केरळच्या रोग निरीक्षण अधिकार्‍यानुसार बर्ड फ्लूला तोंड देण्यासाठी दोन्ही ठिकाणी 35 विशेष टीम गठीत करण्यात आल्या आहेत. या टीमने पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या मारणे आणि त्यांची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू केले आहे. सोबतच जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने प्रभावित 10 किलोमीटरच्या परिसरात अंडी, चिकन व अन्य जनवारांच्या खरेदी-विक्रीवर तात्काळ बंदी आणली आहे. केरळमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसची 19 प्रकरणे समोर आली आहेत. भारतात कोरोना व्हायरसची पहिली तीन प्रकरणे सुद्धा केरळातून समोर आली होती. तिघेही चीनवरून परतले होते. उपचारानंतर ते पूर्णपणे बरे झाले आहेत. या कारणामुळे केरळ सरकार बर्ड फ्लूबाबत अलर्ट आहे.

यूपीच्या दोन शहरात बर्ड फ्लू अलर्ट
केरळशिवाय उत्तर प्रदेशात मागील सुमारे एक महिन्यापासून बर्ड फ्लूचे संकेत मिळत आहेत. यूपीच्या वाराणसी शहरात मागील दिड महिन्याच्या कालावधीत पक्षांचे संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. फेब्रुवारी -2020 च्या सुरूवातीला वाराणसीच्या रोहनिया अंतर्गत मोहन सराय परिसरात मोठ्या संख्येने कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. यापैकी तीन कावळे तपासणीसाठी भोपाळच्या लॅबमध्ये पाठवले होते, ज्यामध्ये एकात बर्ड फ्लूचा संसर्ग असल्याचे स्पष्ट झाले होते. वाराणसीचे मुख्य पशु वैद्यकीय अधिकारी बीबी सिंह यांनी 25 फेब्रुवारी 2020 ला याबाबत माहिती दिली होती. यानंतर जिल्हा प्रशासनाने जेथे मृत कावळे आढळले होते त्या 10 किलोमीटर परिसरातील सर्व पोल्ट्री फार्मच्या तपासणीचे आदेश दिले होते.

मार्च 2020 मध्ये सुद्धा काशी हिंदू विश्वविद्यालयाच्या कृषी फार्ममध्ये वेगवेगळ्या दिवशी अर्धा डझनपेक्षा जास्त कावळे व बगळे मृतावस्थेत आढळले होते. त्यावेळी कृषी विज्ञान संस्था, बीएचयूचे संचालक प्रो. रमेश चंद यांनी 11 मार्चला सांगितले होते की, मागील काही दिवसात कृषी फार्ममध्ये 10 कावळे आणि बगळे मृतावस्थेत सापडले आहेत. यानंतर कर्मचार्‍यांना काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले. परंतु, या कावळ्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याशिवाय 13 फेब्रुवारी 2020 ला वेस्ट यूपीच्या गाझियाबाद शहरात सुद्धा मुख्य विकास अधिकारी अस्मिता लाल यांनी बर्ड फ्लूवर लक्ष ठेवण्यासाठी टीम टास्क फोर्स गठीत केली आहे. सोबतच गाझियाबादमध्ये बर्ड फ्लूला तोंड देण्यासाठी एक कंट्रोलसुद्धा बनवण्यात आला आहे. गाझियाबादमध्ये सध्या बर्ड फ्लूचे कोणतेही प्रकरण समोर आलेले नाही.

युपीच्या दोन शहरात स्वाइन फ्लू
कोरोना व्हायरस व बर्ड फ्लूशिवाय युपीमध्ये स्वाइन फ्लूने सुद्धा पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. जास्त प्रकरणे पश्चिम उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात समोर आली आहेत. 3 मार्चला मेरठमध्ये स्वाइन फ्लूची दोन नवी प्रकरणे समोर आल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने मेरठ प्रशासनाला फ्लूला तोंड देण्यासाठी ठोस कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यापूर्वी मेरठमध्ये पीएसीच्या सुमारे 20 जवानांना स्वाइन फ्लू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. मेरठमध्ये जानेवारी-2020 पासून 04 मार्च 2020 दरम्यान स्वाइन फ्लूची 81 प्रकरणे समोर आली आहेत, तर 9 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. या वर्षाच्या सुरूवातीला दोन महिन्यात मेरठमध्ये स्वाइन फ्लूचे 356 संशयित रूग्णांची तपासणी झाली होती. लखनऊमध्ये सुद्धा या वर्षी आतापर्यंत स्वाइन फ्लूची सुमारे 50 प्रकरणे समोर आली आहेत. शुक्रवारी सुद्धा लखनऊमध्ये स्वाइन फ्लूची पाच नवी प्रकरणे समोर आली. यापूर्वी मंगळवारीसुद्धा लखनऊमध्ये स्वाइन फ्लूचे नऊ रूग्ण आढळले होते. त्यांच्या कुटुंबियांनाही औषध दिले जात आहेत. सर्वांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे.

बिहारमध्ये बर्ड फ्लूची शंका
याच वर्षी जानेवारी महिन्याच्या अखेरीस बिहारमध्ये बर्ड फ्लूचे अस्तित्व जाणवले होते. 28 जानेवारी 2020 ला पटणामध्ये कावळ्यांचा रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली होती. ही घटना पटणाच्या बहादुरपुरमधील समिती परिसरात घडली होती. दोन दिवसात येथे सात कावळे मृत्युमुखी पडले होते. डॉक्टर राकेश रंजन यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी पोहचलेल्या आरोग्य विभागाच्या पथकाने मृत कावळे तपासणीसाठी ताब्यात घेतले. हे कावळे तपासणीसाठी पटणा व कोलकाता येथे पाठवण्यात आले. परंतु, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कावळ्यांच्या मृत्यूचे प्रकरण समोर येताच स्थानिक प्रशासनाने अलर्ट जारी करून सर्व पोल्ट्री फार्मची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.

बिहारमध्ये 8 दिवसात स्वाइन फ्लूचे 6 रूग्ण सापडले
बिहारमध्ये कोरोना व्हायरस आणि बर्ड फ्लूचे संकट असताना आता स्वाइन फ्लूचे संकटदेखील समोर आले आहे. बिहारमध्ये मागील आठ दिवसात स्वाइन फ्लूचे सहा रूग्ण सापडले आहेत. यापैकी एका तरूणाची प्रकृती गंभीर असून त्यास व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. बिहारमध्ये सहा मार्चला एका तरूणीला स्वाइन फ्लू झाल्याचे प्रथम स्पष्ट झाले होते. पटना सिटीच्या गायघाट मोहल्ल्यातील या तरूणीला खुप ताप येत होता. कोरोना व्हायरसच्या संशयाने तपासणी केली असता तिला स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. सिव्हिल सर्जन डॉ. राजकिशोर यांनी सांगितले की, बिहारमध्ये आतापर्यंत पटना, शास्त्रीनगर, रामकृष्ण नगर, गया घाट आणि मच्छरहट्टामधून स्वाइन फ्लूची प्रकरणे समोर आली आहेत. सर्व रूग्णांच्या कुटुंबियांची सुद्धा काळजी घेण्यात येत आहे.

पश्चिम बंगालमध्ये स्वाइन फ्लूचे 13 रूग्ण
पश्चिम बंगालमध्ये स्वाइन फ्लूचे 13 रूग्ण आढळले आहेत. यामध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. मणिपुरची एक महिला, तिचा 10 वर्षांचा मुलगा आणि 23 महीन्यांच्या बाळाचा देखील यात समावेश आहे. मागच्या आठवड्यात सौदी अरबहून मुर्शिदाबादमध्ये परतलेल्या एका व्यक्तीला स्वाइन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले होते. याशिवाय आणखी अनेक संशयित रूग्णांची तपासणी सुरू आहे.