Corona Virus : चीनच्या जेलमध्ये ‘कोरोना’ व्हायरसचे 400 हून जास्त प्रकरणं, प्रशासनानं दिला ‘दुजोरा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – चीनमध्ये कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. या विषाणूमुळे चीनमध्ये आत्तापर्यंत जवळपास २,२३९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७५ हजाराच्या पुढे गेली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हुबेई मध्ये बुधवारी ४१४ नवीन प्रकरणे समोर आली असून फक्त हुबेईमध्येच मृत्यू झालेल्या लोकांची संख्या २,११४ पर्यंत पोहोचली आहे.

चीनच्या तुरुंगात कोरोना विषाणूची ४०० पेक्षा जास्त प्रकरणे पुढे आली आहेत. प्रांतीय आरोग्य आयोगाने पत्रकार परिषदेत सांगितले की, पूर्व शेडोंग प्रांतातील रेनचेंग तुरुंगात सात गार्ड आणि २०० कैद्यांचा अहवाल सकारात्मक आला आहे. याव्यतिरिक्त, पूर्व झेजियांग प्रांतातील शिलीफेंग तुरुंगात ३४ प्रकरणे समोर आली आहेत.

कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता अमेरिकन एअरलाइन्सने चीन आणि हाँगकाँगमधून येणाऱ्या विमानांवरील बंदी २४ एप्रिलपर्यंत वाढविली आहे. तर एअर फ्रान्सने मार्चपर्यंत चीनकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे.

चीनबाहेर ९ लोकांचा मृत्यू

मध्य चीनमधील हुबेई प्रांताची राजधानी वुहान शहरात डिसेंबरमध्ये कोरोना विषाणूची पहिली घटना समोर आली होती. तेव्हापासून हा विषाणू चीनसह जगातील जवळपास २५ पेक्षा अधिक देशांमध्ये पसरला आहे. चीनबाहेर देखील या विषाणूमुळे ९ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी जपानमध्ये ३, हाँगकाँगमध्ये २, इराणमध्ये २, दक्षिण कोरिया आणि फ्रान्समध्ये प्रत्येकी १, अशी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कोणत्या देशात किती प्रकरणे समोर आली

दक्षिण चीन मॉर्निंग पोस्टद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या आकड्यांनुसार शुक्रवारी पहाटेपर्यंत चीनच्या बाहेर लागण झालेल्या लोकांची संख्या- जपान (७२३), दक्षिण कोरिया (१५६), सिंगापूर (८५), हॉंगकॉंग (६९), थायलंड (३५), तैवान (२४), मलेशिया (२२), ऑस्ट्रेलिया (१७), व्हिएतनाम, (१६), जर्मनी (१६), अमेरिका (१५), फ्रान्स (१२), मकाऊ (१०), यूके (९), युएई (९), कॅनडा (८), इराण (५), भारत (३), फिलिपाइन्स (३), इटली (३), रशिया (२), स्पेन (२), इजिप्त (१), कंबोडिया (१), बेल्जियम (१) फिनलंड (१), नेपाळ (१), स्वीडन (१) आणि श्रीलंका (१). या देशात प्रकरणे समोर आली आहेत.

मॉल आणि शॉपिंग सेंटर बंद करण्यात आली

दक्षिण कोरियात कोरोना विषाणूचा पहिला मृत्यू झाला असल्याचे समोर आले होते. या बातमीनंतर काही तासांनी दक्षिण कोरियाचे चौथे मोठे शहर डेगूच्या महापौरांनी शहरवासीयांना घरामध्येच राहण्याचे आवाहन केले. देगुमध्ये विषाणूची ५३ प्रकरणे नोंदली गेली आहेत. शहरातील अनेक मॉल आणि शॉपिंग सेंटर देखील ओस पडली आहेत.