Coronavirus : हवेद्वारे पसरतोय ‘कोरोना’ व्हायरस ? ICMR नं दिलं ‘हे’ स्पष्टीकरण, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : आयसीएमआरने हवेमुळे कोरोना विषाणू पसरल्याचा दावा फेटाळून लावला आहे. आयसीएमआरचे डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी असे स्पष्ट केले की अशा दाव्यांचा कोणताही ठाम वैज्ञानिक आधार नाही. त्यांच्या मते, नवीन विषाणूमुळे, लोक अनेक प्रकारचे दावे करीत आहेत, परंतु ज्या दाव्यांचा वैज्ञानिक आधार आहे केवळ अशा दाव्यांवरच विश्वास ठेवला पाहिजे.

कोरोना व्हायरस हवेत उडत असल्याचा दावा नाकारतांना डॉ. गंगाखेडकर म्हणाले की, असे घडले असते तर ते एका रूग्णापासून कुटुंबातील सर्व सदस्यांपर्यंत पसरले असते. इतकेच नव्हे तर इस्पितळात दाखल झालेल्या लोकांमध्ये हा विषाणू पसरला असता, परंतु अद्यापपर्यंत काहीही दिसले नाही. तसेच तोंडातून आणि नाकातून पाण्याचे कण तीन फुटांपर्यंत पसरल्यावर किंवा हात आणि कोणत्याही ठोस पृष्ठभागाच्या साहाय्याने हा विषाणू पसरल्याचे आढळले आहे. म्हणूनच आयसीएमआरने सामाजिक अंतर आणि वारंवार हात धुण्याचे निर्देश दिले आहेत.

कोरोना तपासणीसाठी ग्रीन सिग्नल
दरम्यान, देशभरात कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता मोठ्या प्रमाणात तपासणी मोहिमेस मान्यता देण्यात आली आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) कोविड -१९ चाचणी घेण्यासाठी आणखीन अनेक प्रयोगशाळांना अधिकृत केले आहे. यासह, आयसीएमआरने रक्ताच्या नमुन्यांमधून अँटीबॉडी चाचणीसही मान्यता दिली आहे. आता बायोटेक्नॉलॉजी विभाग (डीबीटी), विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी), वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि अणु संशोधन विभाग (डीएई) यांचे प्रयोगशाळाही कोविड -१९ च्या नमुन्यांची चाचणी घेण्यास सक्षम असतील.

दरम्यान, देशात कोरोनाच्या परिस्थितीबाबत आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, भारतात आतापर्यंत कोरोनाची एकूण ३३७४ प्रकरणे नोंदविली गेली आहेत. तर आतापर्यंत ७९ मृत्यूंची नोंद आहे. तर कोरोनावर उपचारानंतर 267 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.