Coronavirus : क्वारंटाईनमध्ये असलेल्यांवर वॉच ठेवण्यासाठी ‘COVID-लोकेटर’App

पणजी :  वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात वाढत असून देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. गोव्यात देखील कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून गोवा सरकारने याविरोधात पावलं उचण्यास सुरुवात केली आहे. रविवारी गोवा सरकारने ‘COVID-लोकेटर’ अॅप सुरु केले आहे. या अॅपच्या माध्यमातून क्वारंटाईन असलेल्यांवर नजर ठेवता येणार आहे.

गोवा सरकारने सुरु केलेल्या ‘COVID-लोकेटर’ अॅपमध्ये जीपीएस आधारित लोकेशन ट्रॅकर आहे. यामुळे क्वारंटाईन असलेल्या लोकांवर लक्ष ठेवण्यास गोवा सरकारला मदत होणार आहे. क्वारंटाईन करण्यात आलेल्या संशयित रुग्णांनी नियम मोडण्याचा प्रयत्न केला किंवा घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर अॅपद्वारे त्याचा शोध लगेच लावता येणार आहे. संशयित रुग्णाने क्वारंटाईनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर त्याची माहिती तात्काळ प्रशासनाला मिळणार आहे. राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी गोवा सरकारने हा उपक्रम सुरु केला आहे.

अधिकाऱ्यांनी अधिकृत निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही संशयित व्यक्तीला घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. तरी देखील एखादा व्यक्ती घराबाहेर पडला तर ‘COVID-लोकेटर’ अॅपच्या माध्यमातून त्याचा शोध सुरु करण्यात येतो. गोवा आरोग्य मंत्रालयाने इंटुनिज यांच्या सहकाऱ्याने जीपीएस प्रणाली असलेले लोकेश ट्रॅकर सुरु केले आहे. हे अॅप अँड्रॉईडच्या प्लेस्टोअरमधून डाऊलोड करता येते. गोव्याच्या आरोग्य विभागाने शनिवारी सांगितले की, गोव्यात आतापर्यंत कोरोना व्हियरसचे 7 रुग्ण आढळून आले आहेत.