Coronavirus :भारतात 24 तासात 17 जणांचा बळी, आतापर्यंत 166 मृत्यू, ‘कोरोना’बाधितांची संख्या 5734 वर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोना व्हायरस संक्रमणाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, मागच्या २४ तासात देशात कोविड-१९ ची ५४० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर यादरम्यान १७ लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना संक्रमितांचा आकडा ५७३४ वर पोचला असून या व्हायरसमुळे आतापर्यंत १६६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकीकडे ४७३ लोकं आतापर्यंत बरे देखील झाले आहेत. याप्रकारे भारतात कोरोनाची उपस्थित प्रकरणे ५०९५ आहेत. देशभरात लॉकडाऊन नंतर प्रकरणे वेगाने वाढत आहेत, यासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दिल्लीच्या काही हॉटस्पॉट भागांना पूर्णपणे सील केले गेले आहे.

भारतात आता कोरोनाची तपासणी वाढली असून प्रकरणे वेगाने पुढे येत आहेत. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) नुसार देशात आतापर्यंत १,२१,२७१ जणांची तपासणी झाली आहे. मंगळवारी एकाच दिवसात १३,३४५ चाचण्या घेण्यात आल्या त्यातील २,२६७ खासगी लॅबमध्ये घेण्यात आल्या. आयसीएमआर अंतर्गत १३९ लॅब चालवल्या जातात, तर ६५ खासगी लॅबनाही चाचण्या घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. आयसीएमआरने सर्व सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना कोरोना स्क्रिनिंग सुविधा स्थापित करण्यासाठी परवान्यासाठी अर्ज करण्यास सांगितले आहे.

जगभरात कोरोना संक्रमितांचा आकडा १५ लाख वर गेला आहे. आतापर्यंत एकूण १,५००,८३० लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे आणि हा आकडा वेगाने वाढत आहे. तर कोविड-१९ ने मृतांचा आकडा ८७,७०६ वर पोचला असून सर्वात जास्त प्रकरणे अमेरिकेत समोर आली आहेत. यानंतर स्पेन (१४६,६९०) आणि इटली (१३९,४२२) चा नंबर आहे.