Coronavirus : दिलासादायक ! देशात गेल्या 24 तासात 13159 रूग्ण झाले ‘कोरोना’मुक्त, आतापर्यंत सुमारे 3.50 लाख पेन्शट झाले बरे

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत 18 हजारांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. तर 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 18,653 रुग्ण आढळले आहेत. या काळात देशात 507 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना, कोरोनाचा रिकव्हरी रेटही वेगाने वाढत आहे. देशात गेल्या 24 तासांत 13,159 रुग्ण बरे झाले आहेत. यासह, देशात एकूण 3,47,979 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील एकूण प्रकरणांची चर्चा केली तर आतापर्यंत देशभरात 5,85,493 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी 2,20,114 सक्रिय प्रकरणे आहेत, तर 3,47,979 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्याचबरोबर देशातील कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या सध्या 17,400 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरणे
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना विषाणूची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना विषाणूची एकूण 1,74,761 प्रकरणे नोंदविली गेली आहेत. राज्यात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 7,855 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह महाराष्ट्रात कोरोनाचे 75,995 सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत, तर 90,911 रुग्ण बरे झाले आहेत.

दिल्लीत झपाट्याने वाढणारी प्रकरणे
दिल्लीत कोरोना विषाणूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दिल्लीत आतापर्यंत एकूण 87,360 प्रकरणे नोंदविली गेली आहेत. दिल्लीत सक्रिय रुग्णांची संख्या 26,270 आहे तर 58,348 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 2,742 लोकांचा मृत्यू झाला आहे.