Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळं NPR आणि जनगणनेचा पहिला टप्पा पुढं ढकल्याची दाट शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा फैलाव लक्षात घेता १ एप्रिलपासून सुरु होणारी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अपडेट करण्यासाठीचा आणि जनगणना २०२१ चा पहिला टप्पा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात औपचारिक आदेश एक किंवा दोन दिवसात जारी केला जाऊ शकतो. गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “सरकारमध्ये उच्च स्तरावर या विषयावर चर्चा होत आहे आणि कोरोना विषाणूच्या परिणामामुळे हे काम पुढे जाऊ शकते. पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार एनपीआर अद्ययावत करणे आणि जनगणनेसाठी घरांची यादी करण्याचा सराव १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत करावयाचा आहे.

अनेक राज्य सरकारचा एनपीआरला विरोध
गेल्या आठवड्यात गृहमंत्रालयाने म्हटले होते की, जनगणना २०२१ आणि एनपीआर अद्ययावत करण्याची तयारी जोरात सुरू असून १ एप्रिलपासून या सराव सुरू होईल. दरम्यान, बरीच राज्य सरकारे एनपीआरला विरोध करीत आहेत आणि काही विधानमंडळांनी त्यावर आक्षेप घेणारे ठराव मंजूर केले होते. एनपीआरला विरोध करणाऱ्या राज्यांमध्ये केरळ, बंगाल, पंजाब, राजस्थान, छत्तीसगड आणि बिहारचा समावेश आहे. दरम्यान, बहुतेक राज्यांनी असेही म्हटले आहे की, ते जनगणनेसाठी घरांची यादी करण्याच्या कामात सहकार्य करतील.

जनगणना आणि एनपीआरला उशीर होण्याची शक्यता :
१ एप्रिलपासून सुरू होणारी जनगणना आणि एनपीआरची प्रक्रिया केंद्र सरकारकडून सध्या थांबविली जाऊ शकते. भारतात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे, हे लक्षात घेता गृह मंत्रालयाने जनगणना व एनपीआर देखील लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे कोविड -१९ चा प्रादुर्भाव पाहता यामुळे उशीर होण्याची शक्यता आहे.