Lockdown Again : UP, बिहारसह देशातील अनेक राज्यामध्ये लॉकडाऊन, पुण्यात 13 जुलैपासून होणार लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि केरळसह अनेक राज्यात कोरोना विषाणूच्या (COVID-19) वाढत्या प्रकरणांमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. तर मुंबईच्या ठाणे येथे 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. याशिवाय पुण्यात 13 जुलैपासून 10 दिवस लॉकडाऊन लागू केले जाईल. कोरोना विषाणूची वाढती संख्या लक्षात घेता उत्तर प्रदेशात 50 तासांपेक्षा जास्त काळ कडक लॉकडाऊन लागू झाल्यानंतर शनिवारी सकाळपासूनच राज्यातील बहुतेक शहरांमधील रस्ते ओसाड दिसत आहेत.

यूपीमध्ये 10 जुलै रोजी रात्री 10 वाजता सुरू झालेले लॉकडाऊन 13 जुलै रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. पोलिसांनी अनेक शहरांमध्ये बॅरिकेडिंग केली आहे. यावेळी बहुतेक दुकाने बंद आहेत. फक्त दूध, फळे आणि भाजीपाला अशा इतर आवश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानेच चालू आहेत. बरेच लोक घरातच राहिले. अनेक ठिकाणी पोलिसांनी घराबाहेर पडलेल्या लोकांची ओळखपत्रे तपासली. विनाकारण भटकणाऱ्या लोकांना परत पाठविण्यात आले.

कामरूपमध्ये लॉकडाऊन वाढविण्याच्या सूचना

आसामच्या नागरी समित्यांनी पुढील दोन आठवड्यांसाठी कामरूप महानगरात लॉकडाऊन वाढविण्याचे सुचविले आहे. आसामचे आरोग्यमंत्री हिमांता बिस्व शर्मा म्हणाले की आरोग्य विभाग लॉकडाऊन एका आठवड्यासाठी वाढविण्याच्या बाजूने आहे. यासंदर्भात उद्या एक अधिसूचना जारी केली जाईल.

बिहारमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. ते पाहता 11 जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. येथे बर्‍याच जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी लॉकडाऊन लागू केले गेले आहे. राजधानी पटनासह कैमूर, बक्सर, नवादा, सुपौल, मधेपुरा, खगेरिया, मुंगेर, किशनगंज, मुजफ्फरपूर, पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, मधुबनी, नालंदा, भागलपूर, बेगूसराय, मधेपुरा येथे लॉकडाऊन लागू आहे. 11 ते 16 जुलै दरम्यान बेगूसराय, 11 ते 15 जुलै पर्यंत नालंदा, 10 ते 16 जुलै दरम्यान मुंगेर, 10 ते 16 जुलैपर्यंत मधेपुरा, 10 ते 14 जुलै दरम्यान खगेरिया, मुझफ्फरपूर आठवड्यात दोन दिवस, पटना येथे 10 जुलै ते 16 जुलैपर्यंत, बक्सरमध्ये 10 जुलै ते 12 जुलैपर्यंत, नवादामध्ये 10 जुलै ते 12 जुलै पर्यंत लॉकडाउन लागू आहे.

तिरुअनंतपुरम लॉकडाऊन: कंटेनमेंट झोनमध्ये ट्रिपल लॉकडाऊन

केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये शुक्रवारी एका आठवड्यासाठी लॉकडाऊन वाढविण्यात आले. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी ही घोषणा केली. कंटेनमेंट झोनमध्ये ट्रिपल लॉकडाउन लागू होईल असे देखील नमूद केले आहे. हे पाहताच आज शहरातील रस्त्यावर आलेल्या लोकांचे ओळखपत्र पोलिसांनी तपासले.

उत्तराखंड लॉकडाऊन: लग्न समारंभात उपस्थित असलेले 24 लोक पॉझिटिव्ह, दोन दिवस संपूर्ण लॉकडाऊन

उत्तराखंडच्या काशीपूर महानगरपालिका क्षेत्रात दोन दिवसांपासून संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. येथे लग्न समारंभास हजेरी लावलेल्या 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. यानंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने प्रभावीपणे काशीपुरात दोन दिवस लॉकडाऊन जाहीर केले. शनिवारी सकाळी दहा वाजता हे लागू करण्यात आले.

पश्चिम बंगाल लॉकडाऊन: 23 पैकी 20 जिल्ह्यांमध्ये कंटेनमेंट झोन

पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी संध्याकाळी 5 वाजेपासून एका आठवड्यासाठी लॉकडाऊन लागू आहे. राज्यातील 23 पैकी 20 जिल्ह्यांमध्ये कंटेनमेंट झोन आहेत. खासगी आणि सार्वजनिक वाहनांवरील निर्बंध लागू आहेत, तर इतर सर्व आवश्यक विक्रीची दुकाने बंद आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये लोकांची हालचाल रोखण्यासाठी बॅरिकेड्स बसविण्यात आले आहेत. काही भागात जीवनावश्यक वस्तू असलेली दुकाने केवळ चार तासच उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोलकातामध्ये 25 कंटेनमेंट झोन आहेत, उत्तर 24 परगनामध्ये 93, दक्षिण 24 परगनामध्ये 54 आणि हावडामध्ये 56 कंटेनमेंट झोन आहेत. हे पहिले चार हॉटस्पॉट असणारे जिल्हे आहेत.

महाराष्ट्र लॉकडाऊन: 10 दिवसांपर्यंत लागू होतील निर्बंध

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील काही भागात 13 जुलैपासून 10 दिवसांचे लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. लॉकडाऊन 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून लागू होईल आणि 23 जुलै रोजी समाप्त होईल. लॉकडाऊनसंदर्भात लवकरच सविस्तर आदेश लवकरच देण्यात येणार असल्याचे पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. ठाण्यात लॉकडाऊन 19 जुलैपर्यंत वाढविण्यात आले आहे. 2 जुलै ते 12 जुलै या कालावधीत लावण्यात आलेले लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. आता लॉकडाऊन 12 जुलै ते 19 जुलै दरम्यान लागू असेल.