Coronaviurs : आता मध्य प्रदेशातील खेडयापाडयापर्यंत पोहचला ‘कोरोना’, 462 गावांमध्ये 951 रूग्ण, 50 जिल्हयात संक्रमण

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मध्य प्रदेशात कोरोना साथीचा रोग आता शहरांमधून खेड्यात जाऊ लागला आहे. सरकारने म्हटले कि, राज्यात कोरोना साथीने आता 50 जिल्ह्यातील 462 गावांत प्रवेश केला आहे. या अहवालानुसार या खेड्यांमध्ये आतापर्यंत 951 लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे, तर 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा खुलासा अश्या वेळी झाला, जेव्हा सरकारने दावा केला होता कि, राज्यात साथीचा प्रादुर्भाव थांबू लागला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीस, राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, उर्वरित भागांमध्ये परिस्थिती नियंत्रणात असल्याने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राजधानी भोपाळवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते.

मध्य प्रदेश सरकारच्या पंचायत व ग्रामविकास विभागाच्या अहवालानुसार मध्य प्रदेशातील 462 गावात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 479 कामगार तर 472 इतर ग्रामीण आहेत. 21 मे रोजी राज्यातील खेड्यांमध्ये 336 जण संक्रमित होते, त्यांपैकी 130 मजूर आणि 206 ग्रामीण होते. अहवालात म्हटले आहे की, आतापर्यंत 29,881 लोकांची कोरोना तपासणी झाली आहे. यापैकी 26,422 लोकांचे अहवाल आले आहेत, त्यापैकी 951 लोक संसर्गित असल्याचे आढळले आहे. 21 मे रोजी राज्यातील 186 खेड्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले होते, परंतु गेल्या 22 दिवसांत 462 गावात कोरोना पसरला आहे, 276 नवीन गावे कोरोनाच्या कचाट्यात अडकले आहेत.

खेड्यांमध्ये आरोग्य सेवा शहरांइतकीच चांगली नसल्याच्या परिस्थितीत हा अहवाल समोर आला आहे. अशा परिस्थितीत खेड्यांमधील साथीवर नियंत्रण ठेवणे हे एक मोठे आव्हान असेल. अहवालानुसार राज्यातील होशंगाबाद आणि निवारी या जिल्ह्यांतील गावात ही रोगराई पोहोचली नाही. मात्र, इंदूर जिल्ह्यातील खेड्यांमध्ये या आजाराची सर्वाधिक 90 घटना समोर आल्या असून त्यापैकी आठ गावात एकूण 14 जणांचा मृत्यू झाला आहे. खारगोन जिल्ह्यातील गावात 51, भिंड जिल्ह्यातील गावात 50, निमूच जिल्ह्यातील गावात 43, ग्वाल्हेर जिल्ह्यातील गावात 42 आणि बुरहानपूर जिल्ह्यातील गावात 41, लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. दरम्यान, खेड्यांमधील कोरोनाशी सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.