COVID-19 Alert : ‘कोरोना’चे हे आहेत 11 लक्षणे, जाणून घ्या ‘गंभीर’, ‘मध्यम’ आणि ‘हलक्या’ संक्रमणातील फरक

नवी दिल्ली : भारतासह जगभरात दररोज कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. दिलासादायक बाब ही आहे की, वाढत्या संसर्गासोबत भारतात कोरोना संक्रमित रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाणसुद्धा वेगाने वाढत आहे. जसजसा वेळ जात आहे, कोरोना संसर्गाची लक्षणेसुद्धा वाढत चालली आहेत. सुरूवातीला कोरोनाची केवळ चार लक्षणे होती, जी आता 11 झाली आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोना व्हायरसच्या 11 लक्षणांची यादी जारी केली आहे. जाणून घेवूयात कोणती आहेत ही लक्षणे आणि कोरोना संसर्गाशी संबंधीत काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे…

कोरोना व्हायरसची लक्षणे
सुरूवातीला कोरानाची चार लक्षणे होती, खुप ताप येणे तसेच खोकला, घशात खवखव, वाहते नाक किंवा बंद नाक आणि श्वास घेण्यास त्रास होणे. आता जसजशी कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे, त्याची लक्षणेसुद्धा वाढत चालली आहेत. सध्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 11 लक्षणांना अधिकृत परवानगी दिली आहे.

ही नवीन लक्षणे आहेत, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, थरथरणे, अतिसार, उलटी आणि कफमधून रक्त येणे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार वास आणि चव न जाणवणे ही सुद्धा कोरोनाची प्रमुख लक्षणे आहेत. डब्ल्यूएचओसह जगभरातील संशोधक आणि डॉक्टर कोरोना व्हायरसची अन्य लक्षणे जाणून घेत आहेत. अनेक रिपोर्टमध्ये हा सुद्धा दावा करण्यात आला आहे की, कोरोना व्हायरसमध्ये लागोपाठ बदल होत आहेत. मात्र, याबाबत वेगवेगळी मते आहेत.

कोरोनापासून बचावाच्या 15 पद्धती
भारत सरकारसह डब्ल्यूएचओ, कोरोना व्हायरसच्या लक्षणांसह त्यापासून बचावाच्या उपायाबाबतही जागृत करत आहे. या उपायांमध्ये 15 आवश्यक टिप्स आहेत. यामध्ये योग्य अंतर राखून अभिवादन करणे, सार्वजनिक ठिकाणी 6 फुटाचे अंतर राखणे, पुन्हा वापरता येणारा घरी बनवलेला मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय विनाकारण डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करू नये, श्वसन क्षमता चांगली राखणे, सतत हात धुणे, तंबाखू उत्पादनांचे सेवन न करणे आणि सार्वजनिक ठिकाणी न थूंकणे, नेहमी स्पर्श होणारे पृष्ठभाग नियमित स्वच्छ व किटाणूरहित ठेवणे, विनाकारण प्रवास न करणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करणे, संक्रमित अथवा देखभाल करणार्‍या लोकांशी भेदभाव न करणे, विश्वसनीय सूचनांवर विश्वास ठेवणे, कोणतेही लक्षण आढळल्यास केंद्राची टोल फ्री हेल्पलाईन 1075 किंवा राज्याच्या हेल्पलाईनवर संपर्क करणे आणि मानसिक तणाव अथवा त्रास झाल्यास मनोसामाजिक सहायता सेवांची मदत घेणे, इत्यादी सल्ला देण्यात आला आहे.

कोरोना व्हायरस हवेतून पसरतो अथवा नाही
आकाशवाणी समाचारशी चर्चा करताना दिल्लीच्या लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजचे कोरोना तज्ज्ञ डॉ तन्मय तालुकदार यांनी कोरोनाच्या हवेतून पसरण्याच्या स्थितीबाबत स्पष्टीकरण दिले. त्यांच्यानुसार, शिंकणे किंवा खोकल्यातून निघालेले ड्रॉपलेट कुणाच्या डोळे, नाकात किंवा तोंडात गेल्यास ती व्यक्ती संक्रमित होऊ शकते. अनेकदा ड्रॉपलेटमधून सुद्धा छोटे कण (एयरसोल) हवेत फिरत राहतात. डब्ल्यूएचओनुसार जर ताजी हवा येण्यासाठी योग्य व्हेंटिलेशन नसेल तर अशा स्थितीत उपस्थित लोक संक्रमित होऊ शकतात. याशिवाय गर्दीच्या ठिकाणी सुद्धा एयरसोल होऊ शकते. यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. तसेच यासाठी मास्क घालणे जरूरी आहे.

ऑक्सीजन सॅच्युरेशन झाल्यास काय करावे
कोरोनाच्या बहुतांश रूग्णांमध्ये ऑक्सीजन सॅच्युरेशन (ऑक्सीजनची कमतरता) होत नाही. याच लक्षणांच्या आधारावर कोरोना संक्रमित रूग्णांना धोकादायक, मध्यम आणि हलक्या लक्षणांच्या रूग्णांच्या यादीत सहभागी केले जाते. ऑक्सीजन सॅच्युरेशनशिवाय सुद्धा काही अन्य मानक ठरलेले आहेत. डॉ तन्मय तालुकदार यांच्यानुसार ऑक्सीजन सॅच्युरेशन मोजण्यासाठी रूग्ण ऑक्सी पल्स मीटरचा वापर करता येईल. यातून रक्तातील ऑक्सीजनचा स्तर समजतो. कारण व्हायरस सर्वात जास्त फुफ्फुसांना प्रभावित करतो, अशावेळी जास्त संसर्ग झाल्याने रूग्णात ऑक्सीजन कमी होऊ लागतो. ऑक्सीजन लेव्हल जर 90 पेक्षा कमी झाली तर त्यास गंभीर रूग्ण मानले जाते. 94 पेक्षा कमी ऑक्सीजन स्तरवाले रूग्ण मध्यम श्रेणीत आणि 95 पेक्षा जास्त ऑक्सीजन स्तरवाल्या रूग्णांना हलकी लक्षणवाल्या रूग्णांच्या श्रेणीत ठेवले जाते.

कोरोना संसर्गासह वेगाने वाढत आहे रिकव्हरी रेट सुद्धा
कोरोनाची लक्षणे आणि रूग्णांची संख्या सतत वाढत असताना चांगली बातमी ही आहे की, देशात कोरोनामुक्त होणारे म्हणजे संक्रमणातून बरे होणार्‍या रूग्णांची टक्केवारी सुद्धा वेगाने वाढत आहे. 25 मार्च 2020ला जेवहा प्रथम लॉकडाऊनची घोषणा केली गेली, त्यावेळी देशात कोरोनामुक्त होणार्‍या रूग्णांचा रिकव्हरी रेट अवघा 7.10 टक्के होता. 15 एप्रिल 2020ला रिकव्हरी रेट वाढून 11.42 टक्के, 3 मेरोजी वाढून 26.59 टक्के, 18 मेराजी 38.29 टक्के, 31 मेराजी 47.76 टक्के आणि अनलॉक – दोन मध्ये 15 जुलै 2020 ला रिकव्हरी रेट 63.24 टक्क्यांवर पोहचला आहे. याचा अर्थ असा आहे की, देशात ज्या वेगाने रूग्णसंख्या वाढत आहे, तेवढ्याच वेगाने रूग्ण बरे सुद्धा होत आहेत.