निवडणूक आयुक्त अशोक लवासा होणार एशियन बँकेचे उपाध्यक्ष, कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच देणार राजीनामा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बुधवारी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांची फिलीपिन्स येथील एशियन विकास बँकेचे (एडीबी) नवीन उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडणूक आयोगाचा राजीनामा देऊनच ते हे पद सांभाळू शकतात. ऑक्टोबर २०२२ मध्ये ते मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) म्हणून निवृत्त झाले असते. आपला कार्यकाळ संपण्यापूर्वी लवासा हे राजीनामा देणारे दुसरे निवडणूक आयुक्त असतील.

बँकेने एका निवेदनात म्हटले की, एडीबीने अशोक लवासा यांना प्रायव्हेट सेक्टर ऑपरेशन्स अँड पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. ते दिवाकर गुप्ता यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट रोजी संपणार आहे. सरकारच्या सूचनेनुसार त्यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. एडीबीच्या कामकाजाची माहिती असणार्‍या लोकांचे म्हणणे आहे की, कोणतीही आंतरराष्ट्रीय संस्था नियुक्त झालेल्या व्यक्तीची संमती न घेता नियुक्तीची घोषणा करत नाही. लवासा यांच्यापूर्वी १९७३ मध्ये सीईसी नागेंद्र सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, जेव्हा ते हेग मधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले होते.

लवासा यांची एडीबीमध्ये नेमणूक झाली नसती तर पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये ते सीईसी झाले असते आणि त्यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश, बंगाल, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर, गोवा आणि इतर राज्यात निवडणुका घेण्यात आल्या असत्या. २०१९ च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा यांना आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल क्लीन चिट देण्याबाबत असहमती दर्शवल्यावर लवासा चर्चेत आले होते.