‘ईडी’ची मोठी कारवाई ! ‘नीरव’ आणि ‘मेहुल’चे हाँगकाँगमधील 1350 कोटींचे ‘हिरे’ आणले भारतात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 14 हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याचा आरोप असलेल्या हिरा व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ईडीने 2300 किलो कट हिरे आणि मोती हाँगकाँगमधून भारतात आणले आहेत. 1350 कोटी रुपयांचे हे हिरे-मोती नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्या कंपन्यांशी संबंधित आहेत. नीरव सध्या लंडनमध्ये असून त्याच्या भारत प्रत्यार्पणासाठी कायदेशीर कारवाई सुरू आहे.

सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्या
ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की फरार आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्या कंपन्यांचे हिरे आणि मोती 108 खेपमध्ये मुंबईत आणण्यात आले. यापैकी 32 खेप नीरव मोदी यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या विदेशी कंपन्यांच्या आहेत. उर्वरित खेप मेहुल चोकसीच्या कंपन्यांची आहेत. या वस्तूंमध्ये हिरे आणि मोत्यासह चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. या सर्वांचे एकूण मूल्य 1350 कोटी रुपये आहे. या मौल्यवान वस्तू हाँगकाँगमधून भारतात आणण्यासाठी ईडीने सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण केली होती.

या दोघांविरूद्ध मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत चौकशी सुरू आहे
पीएनबी बँक घोटाळा प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत ईडी दोन्ही आरोपींची चौकशी करीत आहे. या कायद्यांतर्गत नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्या कंपन्यांच्या मौल्यवान वस्तू ईडीने जप्त केल्या आहेत.