राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संकेतस्थळ हॅक

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संकेतस्थळ काल हॅक झाले होते. बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्याचा संदेश हॅकर्सनी संकेतस्थळावर प्रसिद्ध केला होता. बलात्कार प्रकरणात केल्या जाणाऱ्या राजकारणाचा निषेधही हॅकर्सकडून करण्यात आला. हा संदेश शुक्रवारी दुपारी काही तास संकेतस्थळावर दिसत होता. याबद्दलची माहिती आयटी सेलला देण्यात आली. यानंतर लगेचच हा मजकूर डिलीट करुन संकेतस्थळ पूर्ववत करण्यात आले.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे (एनएफएआय) संकेतस्थळ रनटाईम सोल्युशन्य या खासगी कंपनीने तयार केले आहे. संकेतस्थळ आकर्षक करण्यासाठी या कंपनीकडे जबाबदारी देण्यात आली होती. काल हॅकर्सनी संकेतस्थळ हॅक करुन त्यावर इंग्रजी आणि हिंदीत मजकूर प्रसिद्ध केला. बलात्कार प्रकरणाचे राजकारण करु नका आणि या घटनेला धार्मिक रंग देऊ नका, असा मजकूर हॅकर्सनी प्रसिद्ध केले होते.

संकेतस्थळ हॅक करणाऱ्या व्यक्ती किंवा व्यक्तींनी कोणताही डेटा चोरण्याचा प्रयत्न केला नसल्याची माहिती संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. या संकेतस्थळाचे सुरक्षा ऑडिट करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.