अयोध्या केसचा निर्णय देणं खूपच ‘आव्हानात्मक’ होतं, माजी सरन्यायाधीश जस्टिस गोगोई यांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   राम जन्मभूमी प्रकरणात निर्णय सुनावणार्‍या सुप्रीम कोर्टाच्या पाच जजच्या खंडपीठाचे अध्यक्ष असणारे भारताचे तत्कालीन सर न्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटले की, या केसमध्ये निर्णय सुनावणे आव्हानात्मक काम होते. जस्टिस गोगोई यांनी हे वक्तव्य पत्रकार माला दीक्षित यांचे पुस्तक ’अयोध्या से अदालत तक भगवान श्रीराम’ वर आयोजित व्हर्च्युअल परिसंवादासाठी पाठवलेल्या संदेशात केले आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या उपक्रमात आयोजित या परिसंवादात सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीश जस्टिस ज्ञानसुधा मिश्रा, अलाहाबाद हायकोर्टचे माजी न्यायाधीश एस. आर. सिंह, अयोध्यामध्ये जन्मभूमी परिसरातील उत्खननात सहभागी असलेले भारतीय पुरातत्व सर्वेचे माजी अतिरिक्त महासंचालक बी. आर. मणी, प्रसिद्ध पत्रकार आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, न्यासाचे अध्यक्ष रामबहादुर राय, आणि वरिष्ठ पत्रकार एन. के. सिंह यांनी आपले विचार मांडले.

जस्टिस गोगोई यांनी आपल्या संदेशात म्हटले की, अंतिम निर्णयापर्यंत पोहचणे अनेक कारणांमुळे एक आव्हानात्मक काम होते. 40 दिवसांपर्यंत सातत्याने चाललेल्या सुनावणीत प्रसिद्ध वकिलांनी खंडपीठाला केलेल सहकार्य अभूतपूर्व होते.

जस्टिस गोगोई यांनी म्हटले, पुस्तक सर्व घटनांचे एका दृष्टीकोनातून वर्णन करत आहे, मला खात्री आहे वाचकांना ते आवडेल.

जस्टिस ज्ञानसुधा मिश्रा यांनी या परिसंवादात म्हटले की, सामान्यपणे लोकांना न्यायालयात मोठा कालावधी गेल्याने वाईट वाटते. या प्रकरणात सुद्धा वेळ लागला, परंतु जेव्हा सुप्रीम कोर्टाने तत्परता दाखवली आणि निर्णय दिला, तेव्हा सर्वांनी याचे कौतूक केले. माझ्या माहितीप्रमाणे निर्णयापर्यंत काय-काय घडले ते पुस्तकात कदाचित प्रथमच सांगितले गेले आहे. या पुस्तकाला न्यायाची संस्मरणीय यात्रा म्हणता येईल, जे कायद्याच्या विद्यार्थ्यांना रिसर्चसाठी उपयोगी येईल.

जस्टिस एस. आर. सिंह म्हणाले, हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की, न्यायालयात न्याय मिळण्यासाठी उशीर का होतो. तर वरिष्ठ पत्रकार रामबहादुर राय म्हणाले, हे पुस्तक सांगते की, गरज पडल्यास सुप्रीम कोर्ट संकट मोचकाच्या भूमिकेत सुद्धा येऊ शकते.