Good News ! DRDO चे 2-डीजी औषध ऑक्सीजन सपोर्टच्या रूग्णांसाठी बनले ’संजीवनी’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या 2-डीजी औषधाबाबत चांगली बातमी समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ऑक्सीजन सपोर्टवर ठेवलेल्या 42 टक्के रुग्णांना 2-डीजी औषधाचे दोन डोस दिल्यानंतर ऑक्सीजन सपोर्टवरून हटवण्यात आले आहे आणि त्यांच्यात सुधारणा दिसून येत आहे. देशात जिथे कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार माजवला आहे तिथे ऑक्सीजन सपोर्टवरील रूगांसाठी डिआरडीओचे 2-डीजी औषध गेमचेंजर ठरू शकते, असा दावा करण्यात आला आहे.

डीआरडीओकडून काल म्हणजेच सोमवारी दुपारी कोविड-19 विरोधी औषध 2-डीजीचा पहिला 10 हजार डोसचा साठा जारी केला. येत्या दोन दिवसात हे औषध बाजारात उपलब्ध होईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन औषध लाँच केले. यावेळी राजनाथ सिंह म्हणाले, 2-डीजी औषध आत्मनिर्भरतेच्या दिशेने मैलाचा दगड आहे. कोविड-19 ची मध्यम लक्षणे आणि गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवर 2-डीऑक्सी-डी-ग्लुकोज (2-डीजी) औषधाच्या आपत्कालीन वापरासाठी भारताच्या औषध महाव्यवस्थापकांकडून (डीजीसीआई) मंजूरी मिळाली आहे.

या प्रसंगी राजनाथ सिंह यांनी म्हटले की, हे औषध कोविड-19 रूग्णांच्या उपचारासाठी आशेचा किरण आहे. हे देशाच्या शास्त्रज्ञांच्या कौशल्याचे अनोखे उदाहरण आहे. ही वेळ थकण्याची आणि आराम करण्याची नाही, कारण या महामारीच्या स्वरूपाबाबत निश्चित माहिती नाही. डीआरडीओकडून आयोजित या कार्यक्रमात ते म्हणाले, आपल्याला खुप सावधगिरीने पावले टाकत पुढे जायचे आहे.