पुणे-सातारा, पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर टोल दरात वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे-सातारा, पुणे-नाशिक आणि पुणे-सोलापूर या तीनही महामार्गावर प्रवास करणे आजपासून महागले आहे. या महामार्गावर आकारण्यात येणाऱ्या टोलमध्ये आजपासून वाढ होणार आहे. त्यामुळे टोलमध्ये अंदाजे पाच ते पस्तीस रुपयांची वाढ होणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील टोलच्या कराराप्रमाणे जुन्या टोलची मुदत ३१ मार्चला संपत असल्याने आज पासून वाढीव टोल आकारण्यात येणार आहे.

पुणे-सातारा महामार्गावर दोन टोलनाके आहेत. पुण्याहून साताराला जाणाऱ्यासांठी एकेरी टोल १६० रुपये तर दुहेरी टोल २३५ रुपये द्यावे लागणार आहे. याच मार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावर हलक्या मोटारींना एकरी प्रवासासाठी ९० आणि दुहेरीसाठी १३५ रुपये, तर आनेवाडी येथे एकेरी प्रवासासाठी ६० तर दुहेरीसाठी ९५ रुपये टोल आकारला जात होता. आता खेड-शिवापूर टोलनाक्यावर एकेरी प्रवासासाठी ९५ तर दुहेरीसाठी १४० आणि आनेवाडी टोल नाक्यावर एकेरीसाठी ६५ तर दुहेरीसाठी ९५ रुपये टोल आकारला जाणार आहे.

नाशिक महामार्गावर चाळकवाडी टोलनाक्यावर हलक्या वाहनांसाठी आता एकेरी प्रवासासाठी ४० रुपयांऐवजी ४५ द्यावे लागणार आहेत. मात्र, दुहेरी प्रवासासाठीच्या शुल्कात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर एकेरी प्रवासासाठी ७५ रुपयांऐवजी ८० तर दुहेरीसाठी ११५ ऐवजी १२० रुपये टोल आकारण्यात येणार आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावर चार टोलनाके आहेत. या मार्गावर हलक्या वाहनांसाठी २६५ रुपये आणि दुहेरीसाठी ४०० रुपये टोल द्यावा लागणार आहे. पाटसपर्य़ंत हलक्या वाहनांना एकेरी प्रवास ७० आणि दुहेरी प्रवास १०५ रुपये टोल द्यावा लागत होता. हलक्या मालवाहू वाहनांसाठी एकेरी ११० रुपये आणि दुहेरी १७० रुपये द्यावे लागत होते. तेथे आता अनुक्रमे एकेरीसाठी १४५ रुपये, दुहेरीसाठी २२० रुपये टोल द्यावा लागेल.