Coronavirus : मुंबईत मान्सूनमुळं आणखी वाढू शकतो ‘कोरोना’चा कहर, IIT मुबंईचा अहवाल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयआयटी मुंबईने दिलेल्या अहवालात मान्सूनसह कोरोना संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अहवालात दावा करण्यात आला आहे की, आर्द्रतेत वाढ झाल्यामुळे कोरोना विषाणू जास्त काळ वातावरणात जिवंत राहू शकतो. हा अभ्यास आयआयटी मुंबईचे दोन प्राध्यापक रजनीश भारद्वाज आणि अमित अग्रवाल यांनी तयार केला आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, उच्च तापमान आणि कमी आर्द्रतेमुळे खोकला किंवा शिंकल्याचे ड्रॉपलेटस कोरडे होण्यासाठी कमी वेळ लागतो, पण पावसाळ्यात ओलावा असेल आणि लोकांना कोरडे होण्यास जास्त वेळ लागेल. मुंबई, कोलकाता, गोवा ही शहरे डेंजर झोनमध्ये असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

अशा प्रकारे केला अभ्यास
आयआयटी मुंबईचे प्राध्यापक रजनीश भारद्वाज आणि अमित अग्रवाल यांनी कोरोना विषाणूच्या संक्रमणाबाबत एक अभ्यास केला आहे. हा अभ्यास मार्च महिन्यात सुरू केला होता. यासाठी त्यांनी संगणक मॉडेल वापरले. यासाठी त्यांनी तापमान, आर्द्रता आणि पृष्ठभागाला आधार बनवले. दोन्ही प्राध्यापकांनी कोरोना रूग्णाच्या शिंकातून बाहेर पडणारे ड्रॉपलेटस सुकवले. मग त्याची सुकण्याची गती आणि जगातील ६ शहरांमधील दैनंदिन होणाऱ्या संक्रमणांशी तुलना केली.

रजनीश भारद्वाज यांनी सांगितले की, या अभ्यासात आम्ही पाहिले आहे की खोकला किंवा शिंकण्याद्वारे संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकतो. आम्ही संगणक मॉडेल्सच्या माध्यमातून जगातील विविध शहरांच्या तपमानाचा अभ्यास केला. ते म्हणाले की, कोरड्या वातावरणापेक्षा आर्द्रता असलेल्या भागात व्हायरसचा अस्तित्व दर ५ पट जास्त असल्याचे या अभ्यासात आढळले आहे. अशात मुंबईत मान्सून लवकरच येणार असून आर्द्रतेची पातळी ८० टक्क्यांहून अधिक असते. त्यामुळे पावसाळ्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक वेगाने वाढू शकते.

सिंगापूर आणि न्यूयॉर्कचे उदाहरण
रजनीश म्हणाले की, सिंगापूरमध्ये मान्सूनचे आगमन लवकर होते. अशा परिस्थितीत नंतर कोरोनाची काही प्रकरणे पुढे आली आहेत. ते म्हणाले की, सिंगापूरमध्ये आर्द्रता जास्त होती, तर तापमानही जास्त होते, त्यामुळे तो इथे फारस पसरला नाही. कोरोना ड्रॉपलेट कोरडे होण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये सर्वाधिक वेळ लागला. म्हणूनच न्यूयॉर्क हे जगातील कोरोना संक्रमणाने सर्वाधिक प्रभावित शहरांपैकी एक आहे. अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्सच्या पीअर-रिव्यू जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार सिडनी, मियामी आणि लॉस एंजेलिसमध्ये देखील ड्रॉपलेट्स लवकर कोरडे होत होते.

गरम हवामानात सुकून मरतात व्हायरस
रजनीश भारद्वाज म्हणाले की, खोकला आणि शिंका येण्याने हा संसर्ग पसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे गरम हवामानात व्हायरस लवकर सुकतो आणि मरतो. या संशोधनात सहभागी दुसरे प्राध्यापक अमित अग्रवाल म्हणाले की, गरम हवामानात ड्रॉपलेट ताबडतोब बाष्प होऊन सुकतात, म्हणूनच धोक्याचे प्रमाण कमी होते. मात्र भारतीय विज्ञान परिषद आणि एम्स या दोघांनीही अशा प्रकारच्या अभ्यासाच्या बाजूने अद्याप सहमती दर्शवलेली नाही.