Lockdown : ‘लॉकडाऊन’च्या 11 व्या दिवशी मोदी सरकारनं जारी केल्या ‘या’ सूचना, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. नागरिकांनी घरातून बाहेर पडताना घरगुती पद्धतीने तयार केलेले मास्क वापरण्याचा सल्ला केंद्राने शनिवारी दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून लॉकडाऊनचा आजचा 11 वा दिवस आहे.

तोंडाला लावण्यासाठी घरगुती पद्धतीने तयार करण्यात आलेले मास्क वापरावेत. मास्क लावल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. तसेच याचा फायदा इतरांना देखील होईल. काही देशांना घरगुती पद्धतीने तयार केलेल्या मास्कचा फायदा झाला असल्याचा दावाही करण्यात आला आहे. शनिवारी देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली असून ही संख्या 2902 वर पोहचली आहे. तर मृतांची संख्या 68 वर पोहचली आहे. मागील 12 तासामध्ये देशात 355 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच कालावधीत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी कोरोनाचा सामना करण्यासाठी देशातील सर्व नागरिकांनी घरगुती पद्धतीने (नॉन मेडीकल) तयार केलेले मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. देशात मास्कचा तुटवडा जाणवत असल्याने ट्रम्प यांनी हे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले घरगुती मास्क वापल्याने वैद्यकीय ग्रेडचे मास्क आरोग्य कर्मचाऱ्यांना देता येऊ शकतात.