Corona Vaccination : लसीकरण मोहिमेत अमेरिका अन् चीनला पछाडत अव्वल स्थानावर पोहचला भारत, 12 कोटी 26 लाखाहून जास्त लोकांना दिली ‘लस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना महामारीला पराभूत करण्यासाठी लसीकरणाचा वेग आणखी वाढवण्यात आला आहे. लसीकरणाच्या बाबतीत अमेरिका आणि चीनला मागे टाकत भारत वरच्या स्थानावर पोहचल्याचा दावा करण्यात आला आहे. 92 दिवसातच देशात 12 कोटी 26 लाखांपेक्षा जास्त लोकांना व्हॅक्सीन देण्यात आली आहे. हा आकडा गाठण्यात अमेरिकेला 97 दिवस लागले आणि चीनने 108 दिवसात हे लक्ष्य पूर्ण केले होते. उ.प्र., गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानात एक-एक कोटीपेक्षा जास्त लोकांना व्हॅक्सीन देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दावा केला आहे की, देशात रोज देण्यात येणार्‍या लसींच्या बाबतीत भारत वरच्या स्थानावर पोहचला आहे.

देशात एकुण 60.057 व्हॅक्सीनेशन सेंटर
आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, 12.26 कोटीपेक्षा जास्त लोकांना कोरोना व्हॅक्सीनचा डोस देण्यात आला आहे. शनिवारी 25.65 लाख लोकांनी लसीकरण केले. मंत्रालयाने म्हटले की, देशात एकुण 60.057 व्हॅक्सीनेशन सेंटर बनवण्यात आले आहेत. भारतात दररोज सरासरी 38,93,288 डोस दिले जात आहेत. तर दुसर्‍या नंबरवर अमेरिका आहे, जिथे व्हॅक्सीनचे दररोज सरासरी 30 कोटी डोस दिले जात आहेत. अमेरिकेत 85 दिवसात 9.2 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली, तर इतक्या दिवसात चीनमध्ये 6.14 कोटी आणि ब्रिटनमध्ये 2.13 कोटी व्हॅक्सीनचे डोस लाभार्थ्यांना देण्यात आले होते.

कोव्हॅक्सीनचे उत्पादन दहापट वाढवण्याची तयारी
देशभरात लसीकरण अभियान मजबूत करण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती देताना हर्षवर्धन यांनी ट्विट केले की, छोट्या राज्यांना प्रत्येक सात दिवस आणि मोठ्या राज्यांना प्रत्येक चार दिवसात व्हॅक्सीन पाठवली जात आहे. व्हॅक्सीनची उपलब्धता वाढवण्यासाठी वेगाने पावले उचलली जात आहेत. सप्टेंबर 2021 पर्यंत कोव्हॅक्सीनचे उत्पादन 10 पट वाढवण्याची तयारी आहे. देशभरात कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढ असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले की, महामारीशी लढाई करण्यासाठी प्रत्येक मदत केली जात आहे. या अंतर्गत रेमडेसिविरे उत्पादन आणि पुरवठा दुप्पट करण्यात आला आहे. याशिवाय राज्यांना ऑक्सीजन, व्हॅक्सीन आणि वैद्यकीय उपकरणांचा सुद्धा पुरवठा केला जात आहे.